पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा

पिंपरी चिंचवड,दि.26: स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय प्राप्त करून देण्याचा आणि व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार आज महापालिका अधिकारी आणि कर्मचा-यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या उपस्थितीत केला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर संविधानाच्या प्रास्तविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. 

यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के अनिल रॉय, डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त आशादेवी दुरगुडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, श्रीनिवास दांगट, वामन नेमाणे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय प्राप्त करून देण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य तसेच दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करण्यात आला. भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करीत असल्याची कृतज्ञ भावना व्यक्त करून आपल्या देशाप्रती एकनिष्ठ राहून देशाला प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर ठेवण्याचा सामुहिक संकल्प देखील यावेळी करण्यात आला.

दरम्यान, पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच या पुतळ्याच्या प्रांगणातील भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेच्या कोनशिलेस देखील पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार महेश लांडगे, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, नगरसदस्य बाबासाहेब त्रिभुवन, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माजी नगरसदस्य मारुती भापकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहूल कलाटे आदी मान्यवरांनी देखील पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. विविध संघटनांच्या वतीने देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.      

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.