नागरिकांनी स्वत: पुढे येऊन लस टोचुन घ्यावी-जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड

0 झुंजार झेप न्युज

जालना जिल्ह्यात येत्या आठवडाभरात किमान दीड लाख नागरिकांना लस टोचण्याचे नियोजन करा

जालना,दि.26: जालना जिल्हा लसीकरणामध्ये मागे राहणार नाही याची काळजी घेत येत्या आठवडाभरात जिल्ह्यात किमान दीड लाख नागरिकांना कोव्हीड प्रतिबंधात्मक लस टोचण्याचे नियोजन करण्याचे यंत्रणांना निर्देश देत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपल्या व आपल्या कुटूंबाच्या सुरक्षिततेसाठी स्वत: पुढे येऊन लस टोचुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते. 

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. जयश्री भुसारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखुन त्यापासुन संरक्षण देण्यासाठी संपुर्ण राज्यभरात लसीकरणावर भर देण्यात येत असुन अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पुर्ण करण्याच्या सुचनाही शासनामार्फत देण्यात आल्या आहेत. शेजारच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या जोमाने लसीकरणावर भर देण्यात येत असुन आपला जिल्हाही लसीकरणामध्ये मागे राहणार नाही याची काळजी घेत अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पुर्ण करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

जालना जिल्ह्यामध्ये पाचशे पेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण शिल्लक असलेली 105 गावे, दोन नगरपालिका तसेच लसीकरणाचे प्रमाण नगण्य असलेली 23 गावे आहेत. या गावांमध्ये लसीकरण न झालेल्या नागरिकांची माहिती प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांना पुरवण्यात आली असुन लसीकरण पुर्ण करुन घेण्यासाठी तहसिलदार व नायब तहसिलदारांना नोडल अधिकारी म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे. या सर्व गावातील व नगरपालिकांमधील नागरिकांचा लसीचा पहिला डोस पुर्ण होईल, यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. तसेच जे नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र झाले आहेत अशा नागरिकांना कॉलसेंटरच्या माध्यमातुन माहिती देऊन त्या नागरिकांचेही लसीकरण प्राधान्याने पुर्ण करुन घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिले.

कोरोना या आजारापासुन संरक्षण मिळावे तसेच जिल्ह्यातील नागरिक या आजारापासुन सुरक्षित रहावेत यासाठीच लसीकरणावर भर देण्यात येत असुन यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत लसीकरणाचे देण्यात आलेले उद्दिष्ट पुर्ण होईल, यादृष्टीने एकसंघपणे काम करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. 

या बैठकीस जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.