अभ्यासिकेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत यवतमाळचा टक्का वाढावा-पालकमंत्री संदिपान भुमरे

0 झुंजार झेप न्युज

•डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अभ्यासिका सुरू

•यु.पी.एस.सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

यवतमाळ,दि.26 : यवतमाळ येथे नव्याने तयार करण्यात आलेली डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिका कोविड संसर्गामुळे गेल्या दोन वर्षापासून सुरू करण्यात आली नव्हती, आता मात्र ती सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासिकेच्या माध्यमातून यु.पी.एस.सी. व एम.पी.एस.सी. तसेच इतर परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली पुस्तके व मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेवून यश संपादन करावे व प्रशासकीय सेवेत यवतमाळचा टक्का वाढवून जिल्ह्याचे नाव उंचवावे, असे प्रतिपादन पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी या अभ्यासिकेच्या शुभारंभ प्रसंगी केले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, आमदार मदन येरावार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, नगराध्यक्षा कांचन चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेंद्र कोरे प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री भुमरे यांनी यवतमाळ नगरपालीकेने अभ्यासिकेकरिता जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल व आ. मदन येरावार यांनी ते जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना नाविण्यपुर्ण योजनेंतर्गत अद्यावत व देखणी अभ्यासिका शहराला दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. या अभ्यासिकेतून निश्चित चांगले विद्यार्थी घडल्याशिवाय राहणार नाही अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

 जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार यांनी गरिब विद्यार्थ्यांनादेखील या अभ्यासिकेचा उपयोग होईल असे सांगून अभ्यासामुळे एक विद्यार्थी पुढे गेला तर त्यांची पुढील पीढी सुधारण्यास मदत होते, असे सांगितले. तर आमदार मदन येरावार यांनी अभ्यासिकेतील अद्यावत सुविधांचा वापर करून येथील विद्यार्थी उत्तुंग शिखरावर पोहचावा तसेच त्याने अभ्यासासोबतच विवेकाची देखील जाणीव ठेवावी असे सांगितले. 

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने मुलांना अभ्यास करण्यासाठी व शहराच्या वैभवात भर घालणारी अभ्यासिकेच्या रुपात एक चांगली वास्तु येथे तयारी झाली आहे. अभ्यासिकेत संगणक कक्ष व मार्गदर्शनासाठी प्रशस्त हॉल उपलब्ध आहे. येथे दर आठवड्यात युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तसेच इतर वक्त्यांचे मार्गदर्शन सत्र ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, एम.पी.एस.सी. व यु.पि.एस.सी. च्या मुख्य परिक्षा व मुलाखत साठी निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाचे व्यासपीठ अभ्यासिकेच्या माध्यमातून उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी यु.पी.एस.सी. परिक्षेत उत्तीर्ण झालेले जिल्ह्यातील विद्यार्थी स्नेहल ढोके, श्रीकांत मोडक, बंकेश पवार, डॉ. दीक्षा भवरे व दर्शन दुग्गड यांना महात्मा गांधींची मुर्ती, शाल व श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना यु.पी.एस.सी.च्या अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले.

 यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी ओंकारसिंग भोंड, अजय शिरसाट, अभ्यासिकेतील विद्यार्थी, ग्रंथालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.