राज्यात विनाकारण अस्वस्थता निर्माण करू नका, पोलिसांचे काम वाढवू नका; ‘हिजाब’वरून गृहमंत्र्यांची तंबी
मुंबई: कर्नाटकातील हिजाबप्रकरणाचे (Hijab Row) राज्यातही पडसाद उमटत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी हिसाब बंदीविरोधात मोर्चे आंदोलने सुरू आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. हिजाबच्या मुद्द्यावरून राजकीय पक्षांनी विनाकारण राज्यात अस्वस्थता निर्माण करू नये. पोलीस दलाचं काम वाढवू नये, अशी तंबीच दिलीप वळसे पाटील यांनी राजकीय पक्षांना दिली आहे. आज शुक्रवार असल्याने नमाज पठण होणार आहे. त्यामुळे स्थानिक पोलीसांना (police) सूचना दिल्या आहेत. पोलीस सातत्याने मॉनिटरिंग करत आहेत. धर्मगुरुंना विनंती आहे की त्यांनी प्रक्षोभक विधान करू नये. लोकांच्या भावना भडकावू नये. तुमचे हक्क आहेत ते आहेतच. पण विनाकारण या गोष्टीचं भांडवल करू नये, असं सांगतानाच सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी आणि राज्यात शांतता राखावी, असं आवाहनही दिलीप वळसे-पाटील यांनी केलं आहे. वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं आहे.
राज्यात आंदोलन होऊच नव्हे, झालं तर शांततेत पार पडेल यासाठी पोलीस काम करत आहेत. आपण अनावश्यकदृष्ट्या जाती-धर्मात तेढ निर्माण करायला लागलो तर समाजात एक दुही तयार होते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी समजून घेतले पाहीजे. एखाद्या परराज्यात झालेल्या प्रकारावर आपल्या राज्यातील घटनेवर अशाप्रकारचे आंदोलन करू नये अशी भूमिका सर्वांनी घ्यायला हवी. राजकीय पक्षांनीही राज्यात विनाकारण अस्वस्थता निर्माण करून पोलीस विभागाचे काम वाढवू नये. तसेच शांतता पाळण्यासाठी सहकार्य करावे, असं दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे.
