पालकमंत्र्यांच्याहस्ते सोनचिरैया विक्री केंद्राचा शुभारंभ
वर्धा, दि.5: राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत नगर परिषद वर्धाच्यावतीने महिला बचतगटाद्वारा उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी बांधण्यात आलेल्या सोनचिरैया विक्री केंद्राचा पालकमंत्री सुनील केदार यांच्याहस्ते महाराष्ट्र दिनी शुभारंभ करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.सचिन ओम्बासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, जिल्हा नियोजन अधिकारी राजीव कळमकर, मुख्याधिकारी राजेश भगत, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापक चित्रा चाफले आदी उपस्थित होते.
शहरी भागातील महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंना चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत विक्री केंद्र बांधण्यात आले आहे. या ठिकाणी 36 महिला बचतगटांना विक्रीसाठी रोटेशन पध्दतीने प्राथमिक स्वरूपात गाळे उपलब्ध करून देण्यात आले आहे. बचतगटाद्वारे उत्पादित मालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सोनचिरैया हे ब्रॅंड नेम ठरविण्यात आले आहे. गटाद्वारा उत्पादीत मालावर सोनचिरैया असा लोगो वापरण्यात येणार आहे.
विक्री केंद्राचा रिबीन कापून शुभारंभ केल्यानंतर पालकमंत्री सुनील केदार यांनी विक्री केंद्र व तेथील सुविधांची पाहणी केली तसेच बचतगटाच्या महिलांशी त्यांनी संवादही साधला. कार्यक्रमाला मान्यवरांसह क्रांती शहर संघाच्या अध्यक्षा शारदा झांबरे, आस्था वस्तीस्तर संघाच्या अध्यक्षा रेहाना लाला, समूह संसाधन महिला प्रीती मुंजेवार, अर्चना कोरडे, नीलिमा गायकवाड, करुणा भुभूतकर, अर्चना हांडे, दुर्गा मेश्राम, प्रियंका कुमरे, शिल्पा सायरे, प्रिया गिरी, भाग्यश्री साळवे, अमरीन लाला तसेच बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या.

