मॉरिशसच्या आरोग्यमंत्र्यांची नवी मुंबई महानगरपालिका वाशी सार्वजनिक रूग्णालयास भेट
नवी मुंबई : महानगरपालिका रूग्णालयात कार्यान्वित असलेल्या ई- हॉस्पिटल व आयुष सेंटरची पाहणी मॉरिशसचे आरोग्यमंत्री डॉ. कैलाशकुमार सिंग जगुतपाल यांचेसह वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. देवीचंद आनंदी रे सीवुरूथून, डिजीटल आरोग्य सेवा अधिकारी डॉ. भोलाह ममल तसेच इलेक्ट्रॉनिक तथा सूचना तंत्रज्ञान मंत्रालय दिल्लीचे संचालक श्री. रविंद्र कुमार यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक रूग्णालय, वाशी येथे विशेष भेट देत केली. मॉरिशसचे आरोग्यमंत्री डॉ. कैलाशकुमार सिंग जगुतपाल व त्यांचे अधिकारी भारतातील विविध शहरांमधील खाजगी व शासकीय रूग्णालयांना भेटी देऊन तेथील ई हॉस्पिटल व आयुष सेंटरची पाहणी करीत असून त्याची कार्यप्रणाली जाणून घेत आहेत. यामध्ये त्यांनी टाटा व अपोलो या खाजगी रूग्णालयांनाही भेटी दिल्या व पाहणी केली. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, वाशी सार्वजनिक रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत जवादे तसेच संबंधित महापालिका अधिकारी उपस्थित होते.
या भेटी दरम्यान मॉरिशसच्या आरोग्य मंत्र्यांनी मॉरिशस देशाची लोकसंख्या 12.7 लाख इतकी असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या 15 लाखाहून अधिक असूनही डिजिटायझेशनमुळे व त्याचा सुयोग्य वापर होत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयात रूग्णांच्या गर्दीचे नियोजन व्यवस्थित होते असा अभिप्राय देत रूग्णालय व्यवस्थापनाची प्रशंसा केली. त्यासोबतच विशेषत्वाने रूग्णालयात एवढी गर्दी असूनही तेथील स्वच्छतेची नोंद घेत विशेष कौतुक केले. नवी मुंबई शहर स्वच्छ आहेच त्यासोबतच येथील रूग्णालयेदेखील स्वच्छ आहेत असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. या भेटीत त्यांनी रूग्णालयातील ब्लड बँक, ट्रामा सेंटर येथेही भेट देत पाहणी केली व नमुंमपा रूग्णालयातील कामकाजच्या पध्दतीने प्रेरीत झालो असल्याचे अभिप्राय दिले. भारताचे प्रधानमंत्री यांच्या भेटीत नमुंमपा रूग्णालयात राबविण्यात आलेल्या ई-हॉस्पिटल कार्यप्रणालीबाबत चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले.

