“आयटीआय” च्या विद्यार्थ्यांचे बारावी समकक्ष परीक्षेत यश
पिंपरी चिंचवड,दि.25: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आय.टी.आय मोरवाडी येथील प्रशिक्षणार्थींनी १२ वी समकक्षेतेसाठी आवश्यक असणाऱ्या राज्य मंडळाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळविले आहे. परिक्षेस बसलेल्या ९७ विद्यार्थ्यापैकी ९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.कौशल्य विकास विभागाच्या प्रस्तावानुसार शालेय शिक्षण विभागाने आय.टी.आय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना १० वी व १२ वी ची समकक्षता देण्याबाबतच्या धोरणांचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्याच अनुषंगाने प्राचार्य श्री.शशिकांत पाटील यांच्या प्रयत्नांतून संस्थेने राज्य मंडळाचा संस्था संकेतांक मिळविला. प्रशिक्षणार्थ्यांचे सदर परीक्षेचे फॉर्म भरणे, त्यांचे फॉर्म राज्य मंडळाच्या कार्यालयात जमा करणे, प्रशिक्षणार्थींना अभ्यासक्रमाबाबत अवगत करून देणे, याबाबतचे कामकाज संस्थेचे गटनिदेशक श्री. प्रकाश घोडके, निदेशक श्री.विक्रमसिंह काळोखे व लिपिक श्री. विजय चावरिया यांनी पाहिले.
तसेच प्रशिक्षणार्थ्यांना याबाबत वेळोवेळी अवगत करून त्यांचे प्रॅक्टिकल परिक्षेचे नियोजन तसेच समुपदेश व मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित केले. परिक्षेत ९८% निकाल अन्वये प्रशिक्षणार्थी १२ वी समकक्षतेचे प्रमाणपत्र मिळवून पुढील उच्च शिक्षण घेण्यास सज्ज झाले आहेत.

