मनात राम आणि हाताला काम: कौशल्यधिष्ठित शिक्षणाद्वारे रोजगार आणि विकासाची सांगड
मनात राम आणि हाताला काम - राहुल कलाटे
वाकड,दि.10: महाराष्ट्रातील रोजगार आणि गुंतवणूक गुजरातच्या दावणीला बांधणाऱ्या, युवकांचे रोजगार हिरावून घेणाऱ्या, भरतीप्रक्रियेत भ्रष्टाचार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता धडा शिकवा आणि चिंचवडमध्ये यंदा बदल घडवा असा संकल्प राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक मेळाव्यात करण्यात आला.
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या समर्थनात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या अध्यक्षतेखाली काळेवाडीत आयोजित या मेळाव्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले. तुमच्या सर्वांची जबाबदारी आता माझी आहे. बदलत्या जगाची मागणी लक्षात घेऊन तंत्रज्ञान, कौशल्यावर आधारित रोजगार मिळवून देण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेन. अशी खात्री यावेळी राहुल कलाटे यांनी उपस्थित युवकांना दिली. युवकांनीही त्यांना दुजोरा दिला.
यावेळी महिला शहर अध्यक्ष ज्योती निंबाळकर, युवक शहर कार्याध्यक्ष सागर तापकीर, ओबीसी सेलचे अध्यक्ष विशाल जाधव, शहर समन्वयक रजणिकांत गायकवाड, उपाध्यक्ष ओम क्षीरसागर, चिंचवडचे अध्यक्ष मेघराज लोखंडे, जमीर सय्यद, चेतन कापसे, पियुष अंकुश, विकास कांबळे, तबरेज शेख यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
युवक शहरअध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, महायुतीच्या सरकारने युवकांच्या तोंडाला पाने पुसले. वेदांता, फॉक्सकॉन, सेफ्रॉन इंडिया सारख्या शेकडो कंपन्या घालवून महाराष्ट्रातील युवकांच्या हक्काचा रोजगार गुजरातच्या घशात घालण्याचे महापाप केले. विशाल कदम यांनी सूत्रसंचालन केले.
प्रतिक्रिया :
बदलत्या जगाच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यातील चांगल्या रोजगार प्राप्तीसाठी कौशल्याधिष्ठीत शिक्षण आणि उद्यमशीलता यांची सांगड घालून कुशल मनुष्यबळ घडविण्यावर महाविकास आघाडीच्या 'पंचसूत्री'चा भर असेल.
- राहुल कलाटे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, महाविकास आघाडी
आमचा आमदार सुशिक्षित, भविष्याची दूरदृष्टी असलेला पाहिजे. त्यामुळे सर्व धर्म समभाव मानणारा, सुशिक्षित, सुसंस्कृत, राहुलदादांना तरुणांची सर्वाधिक पसंती आहे. सर्वाधिक युवक मतदार असलेल्या चिंचवड विधानसभेमध्ये युवकांनी सत्ताबदल करण्याचा निश्चय आणि राहुल दादांच्या विजयाचा संकल्प केलेला आहे.
- मेघराज लोखंडे
चिंचवड विधानसभाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरचचंद्र पवार पक्ष

