सासवड-जेजुरी परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलिस अधिकाऱ्यांवर निष्क्रीयतेचे आरोप!
पुणे,दि.29 : सासवड व जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील लोकवस्तीत खुलेआम गांजा, ऑनलाईन मटका, हातभट्टी दारू, हुक्का पार्लर, बिंगो-चक्री जुगार तसेच हॉटेल-ढाब्यांवर अनधिकृत मध्यविक्री अशा अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या अवैध व्यवसायांना सासवड पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी व जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या ‘कृपेने’ संरक्षण मिळत असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) – श्रमिक ब्रिगेड यांनी केला आहे.
पक्षाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी, अर्ज आणि निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर तीन वेळा आंदोलन करण्यात आले असूनही अवैध धंद्यांवर अंकुश लागलेला नाही, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली.
सासवड पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाई झाल्याचे सांगितले जात असले, तरी अवैध धंदे सुरूच आहेत. हप्ते देणाऱ्या धंद्यांवर संरक्षण तर हप्ते न देणाऱ्यांवर कारवाई असे दुटप्पी धोरण पोलिसांकडून राबवले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
अनेक अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींवर गंभीर गुन्हे दाखल असूनही त्यांच्यावर तडीपाराची कारवाई होत नाही, असा आरोप रिपब्लिकन पक्षाने केला आहे. त्यामुळे संबंधित पोलिस अधिकारी हे अवैध धंदे रोखण्यात अपयशी ठरले असून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, सासवड पोलिसांनी ८ जून २०२५ रोजी पकडलेला ट्रक कोणाच्या आदेशाने सोडण्यात आला, याची चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. या ट्रक प्रकरणात दोषी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या सर्व मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेडच्या वतीने ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरण आंदोलन करण्यात येणार आहे.
मुख्य मागण्या:
1. जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांची तात्काळ बदली.
2. अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई
3. ट्रक सोडण्याच्या प्रकरणाची चौकशी व दोषींवर निलंबन.
4. सासवड-जेजुरी परिसरात पारदर्शक तपासणी मोहीम राबविणे.

