श्री मारवाडी राजस्थान विद्यालय लातूर येथे राष्ट्रीय विधी सेवा दिन उत्साहात
लातूर, दि. 14 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या समान कार्यक्रमानुसार लातूर येथील श्री मारवाडी राजस्थान विद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारूका यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विधी सेवा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लातूर शहरातील जवळपास ११ विद्यालये व महाविद्यालयातील सुमारे २५० एनसीसी कॅडेट उपस्थित हजर होते. या शिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर यांनी मार्गदर्शन केले.
समाजातील वंचित, गरीब व शोषित घटकांना मोफत व निष्पक्ष न्याय मिळावा, या हेतूने राष्ट्रीय विधी सेवा कायदा १९८७ पारीत करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी ०९ नोव्हेंबर १९९५ पासून करण्यात येत आहे. त्यामुळे म्हणून दरवर्षी ०९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या तीन स्तरावर वंचित, गरीब व शोषित घटकांना मोफत व निष्पक्ष न्याय देण्याचे कार्य विधी सेवा प्राधिकरणमार्फत केले जात असल्याचे श्री. गिरवलकर यांनी सांगितले. तसेच भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार व राज्य घटनेतील मार्गदर्शक तत्वे यावर मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी. एम. खरोसेकर, एन.सी.सी. कमांडर संतोष नवगन व यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

