निगडी–भक्तीशक्ती उड्डाणपूल ते स्पाईन रोड त्रिवेणी नगर सिग्नल परिसरात वाढते अतिक्रमण; तात्काळ कारवाईची नागरिकांची मागणी
पिंपरी चिंचवड दिनांक 14 : निगडी (पिंपरी चिंचवड) परिसरातील भक्तीशक्ती उड्डाणपूल ते स्पाईन रोड, त्रिवेणी नगर सिग्नल या महत्त्वाच्या मार्गावर हातगाडीधारक व टपरीधारकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे वाहतूक कोंडी, पादचारी मार्ग अडथळा, तसेच कायदा-सुव्यवस्था धोक्यात येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या अतिक्रमणासंदर्भात सारथी हेल्पलाईन, F क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, तसेच अतिक्रमण विभाग अधिकारी यांच्याकडे नागरिकांमार्फत वेळोवेळी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, अतिक्रमण विभाग केवळ वरवरची कारवाई करत असून हातगाड्या किंवा टपऱ्या जप्त करण्याची ठोस कारवाई होत नसल्याने अतिक्रमण पुन्हा तेच ठिकाणी उभे राहत आहे.
यामुळे नागरिकांना रोजच्या प्रवासात त्रास सहन करावा लागतो. पादचारी मार्ग पूर्णतः अडवला जात असून शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना जीव धोक्यात घालून रस्त्यातून चालावे लागत आहे.
अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी प्रयत्न केले असता काही हातगाडीधारक आणि टपरीधारक त्यांच्या विरोधात दमदाटी, दबाव आणि विरोध करत असल्याचेही गंभीर प्रकार समोर आले आहेत. स्थानिक काही गुंड प्रवृत्तीचे लोक या अतिक्रमणांना मासिक वसूली करून संरक्षण देत असल्याची माहिती देखील पुढे येत आहे, जी अत्यंत चिंताजनक बाब आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील अतिक्रमण समस्येबाबत पालकमंत्री अजितदादा पवार यांनी महापालिका आयुक्तांना वेळोवेळी स्पष्ट सुचना दिल्या असूनही प्रत्यक्षात फक्त कागदोपत्री कारवाई होत असून परिणाम शून्य असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
नागरिकांची ठाम मागणी:
– त्रिवेणी नगर सिग्नल परिसरातील सर्व अतिक्रमणावर तात्काळ आणि कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी.
– हातगाड्या, टपऱ्या व अनधिकृत बांधकामे जप्त करून जागा मोकळी करावी.
– अधिकारी गाठणाऱ्या अतिक्रमणकारांनी घातलेल्या दबावाची पोलिसांकडून चौकशी करून कठोर कारवाई करावी.
– स्थानिक पातळीवर होत असलेल्या कथित मासिक वसुली प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.
– सचिन काळभोर,भारतीय जनता पार्टी,कार्यकर्ता, पिंपरी चिंचवड शहर
(नागरिकांच्या हितासाठी तातडीने ठोस कृती व्हावी, हीच अपेक्षा.)

