'महेश लांडगे यांच्याविरोधातील घोषणाबाजीवर पक्ष नेतृत्व मौन का?'
• शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह• प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे निवेदन
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी मोशी कचरा डेपो येथील कर्मचारी मृत्यू प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरात झालेल्या आंदोलनात आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या घोषणाबाजीवरून भारतीय जनता पक्षात अंतर्गत नाराजी उफाळून आल्याचे चित्र आहे. भाजपचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी या प्रकरणी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल करत पक्षाच्या शहर नेतृत्वाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
काळभोर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शिवसेना, मनसे, काँग्रेस तसेच अन्य काही संघटनांनी आंदोलनादरम्यान आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्या. मात्र, या प्रकारानंतर भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पक्षाचे प्रवक्ते आणि शहर पदाधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस सार्वजनिक भूमिका घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या घटनेमुळे भाजपमधील गटबाजी उघड झाल्याचा दावा करत, आमदार महेश लांडगे यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नसताना केवळ राजकीय हेतूने त्यांची बदनामी करण्यात आल्याचे काळभोर यांनी म्हटले आहे. विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांना पक्षाकडून प्रभावी उत्तर दिले जात नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
काळभोर यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सभांमध्ये भाजपच्या नगरसेवक आणि आमदारांवर विविध विषयांवरून सातत्याने टीका केली जात आहे. छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा, सांगवी येथील सरकार शितोळे उड्डाणपूल सुशोभीकरण तसेच मोशी कचरा डेपो दुर्घटना या विषयांवरून भाजपची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पक्षाच्या शहर संघटनेने विरोधकांच्या आरोपांना वस्तुनिष्ठ आणि प्रभावी उत्तर देण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, पक्षाच्या शहर कार्यकारिणीत दीर्घकाळ काम करणाऱ्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना स्थान दिल्यास पक्षाची भूमिका अधिक सक्षमपणे मांडता येईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आल्याची माहिती सचिन काळभोर यांनी दिली.

