मोशी कचरा डेपो प्रकरणी महेश लांडगे यांच्याविरोधातील घोषणाबाजीचा भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांचा निषेध
पिंपरी चिंचवड,दि.15: मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसमोर मनसे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच काही पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात "कचरा चोर" अशी घोषणाबाजी केली. या आंदोलनाचा भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
सचिन काळभोर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, मोशी कचरा डेपो दुर्घटना अत्यंत गंभीर असून या प्रकरणात महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कारवाई केली आहे. आयुक्तांनी संजय कुलकर्णी आणि आल्हाट यांना निलंबित केले असून संबंधित ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जात आहे.
सचिन काळभोर यांनी आरोप केला की, या दुर्घटनेशी आमदार महेश लांडगे यांचा कोणताही संबंध नसताना विरोधकांकडून त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. वस्तुस्थिती दुर्लक्षित करून केवळ राजकीय हेतूने "कचरा चोर" अशी घोषणाबाजी करण्यात आली असून हा प्रकार निषेधार्ह असल्याचे त्यांनी म्हटले.
तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असून, कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत चौकशी सुरू असतानाच आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात आंदोलन करून घोषणाबाजी करणे हे केवळ राजकीय स्टंट असल्याचा आरोप सचिन काळभोर यांनी केला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी या घोषणाबाजीचा जाहीर निषेध नोंदवत, मोशी दुर्घटनेतील दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, मात्र निष्पाप व्यक्तींना राजकीय हेतूने बदनाम करू नये, अशी मागणी केली.

