राज्यात सत्तास्थापनेचा अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. भाजप आणि शिवसेनेनंतर तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं. राष्ट्रवादीकडे आज रात्री 8.30 वाजेपर्यंतची वेळ आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आज सत्ता स्थापनेचा दावा करणार की राज्य राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने वाटचाल करणार हे पाहावं लागेल.
या सगळ्यांत शिवसेना खासदार संजय राऊत यांना छातीत दुखण्याच्या कारणास्तव लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉल्केज आढळून आले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर एन्जिओ प्लास्टी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार हे संजय राऊत यांच्या भेटीला लीलावती रुगणालयात गेले होते. त्यांनी संजय राऊत यांच्याशी १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ चर्चा केली. राष्ट्रवादीने ऐनवेळी शिवसेनेला दगा दिल्याच बोललं जात असताना या भेटीला विशेष महत्व आहे. या भेटीनंतर शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला रवाना झाले आहेत.
तर दुसरीकडे इतक्या कमी वेळात आमदारांची जमवाजमव अशक्यच असल्याचं मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर कॉंग्रेस सोबत बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचं देखील अजित पवारांनी सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा सोडला ? असा सवाल उपस्थित होत आहे.

