काळे धंदेवाल्यांसह संघटित टोळ्यांवर कारवाईच्या प्रभारी अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही मटकाबुकींना थारा देण्याचा प्रयत्न होत असल्यास हा गंभीर प्रकार आहे. मटक्याचे रॅकेट मोडीत काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष पथकांमार्फत कारवाई झाल्यास संबंधित प्रभारी अधिकार्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी दिला.
खासगी सावकारांविरुद्धही कारवाईची
मोहीम तीव्र करण्यात येत आहे, असे ते म्हणाले. 'मेन' बंद... 'मुंबई' सुरू!' या मथळ्याखाली दै. 'पुढारी'त प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दखल घेतली आहे.
नागरिकांनी थेट माहिती द्यावी : डॉ. देशमुख
सावला पिता-पुत्रासह टोळीने मेन मुंबई मटक्यावर कब्जा केल्याने भविष्यात मेन मुंबई मटका सुरू होऊ शकणार नाही. त्यामुळे कदाचित मुंबई मटका सुरू झाला असावा, जिल्ह्यात मटक्याचे लोण पसरणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातर्गंत प्रभारी अधिकारी, पोलिसांना सुचना देण्यात आल्या आहेत. हा प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा, अथवा पत्राद्वारे माहिती कळवावी, असेही त्यांनी आवाहन केले.
झीरो पोलिसांवर गुन्हेदाखल करून अटक करणार
जिल्ह्यातील काही पोलिस ठाण्यात झीरो पोलिसांचा हस्तक्षेप होत असल्याचे किंबहुना त्याच्यामार्फत मटक्याची उलाढाल होत असल्याचे निदर्शनास आणून देताच डॉ. देशमुख म्हणाले, झिरो पोलिसांचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही. पोलिसांच्या नावावर कोणी गैरधंदे करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करून तत्काळ अटकेची कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सुनावले.

