पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातांची मालिका सुरूच असताना आज (ता. 29) पहाटे पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. स्विफ्ट डिझायर व टँकरमध्ये झालेल्या या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे, तर दोघेजण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रसायनी गावाच्या पोलिस हद्दीत हा अपघात झाला. स्विफ्ट डिझायर गाडीने टँकरला मागून येऊन जोरदार धडक दिली. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या या गाडीत तीन महिला एक पुरूष व इतर दोन जण होते. यातील एक पुरूष व तीन महिलांचा जागेवरच मृत्यू झाला, तर इतर दोन गंभीर जखमींना कामोठे येथील एमजीएम रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे.
या भीषण अपघातानंतर रासायनी पोलिस लगेचच घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. स्विफ्ट डिझायर गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे, तर ही गाडी सजवलेली दिसत असल्याने कोणत्या तरी लग्नसमारंभातील असल्याची शक्यता आहे. पोलिसांचे ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

