पुणे - पाणीवाटपाच्या करारावरून अडून बसलेल्या पाटबंधारे खात्याला महापालिकेनेही खडसावले आहे. मागील बैठकीत ठरल्याप्रमाणे दररोज १३५० एमएलडी पाणीसाठा घेत आहोत. राज्य सरकारच्या पातळीवर कराराची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे पाण्यासाठी जादा पैसे मागण्याचा प्रश्नच नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले. तसे झाले तरच पुणेकरांना रोज पाणी मिळणार आहे, असेही महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
पुणे शहराला पाणीपुरवठ्यासंदर्भात तातडीने करार करून घ्यावा; अन्यथा दुप्पट कराने पाणीपट्टीची आकारणी करण्यात येईल, असे पत्र पाटबंधारे खात्याने दोन दिवसांपूर्वी महापालिकेला पाठविले होते, त्यावरून नवा वाद निर्माण झाला होता.
त्यावर पालिकेने आज पाटबंधारे खात्याला पत्र पाठवून मंजूर तेवढाच पाणीसाठा पालिकेकडून उचलला जात आहे, त्यामुळे जादा दराने पाणीपट्टी भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उत्तर दिले आहे.
शहराच्या पाणीपुरवठ्यात अडचणी येऊ शकतील, असे कोणतेही पाऊल पाटबंधारे खात्याने उचलू नये. सध्या १३५० एमएलडी पाणी उचलण्यास सहकार्य करण्याबाबतचे पत्र पालिकेने पाटबंधारे खात्याला पाठविले आहे. शहरासाठी पुरेसे पाणी घेण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याच्या सहमतीने यापूर्वीच झाला आहे. त्यानुसारच पालिका पाणी उचलत आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याने जादा दराने पाणीपट्टी आकारणे योग्य नाही.
- रुबल अगरवाल, प्रभारी आयुक्त, महापालिका
- रुबल अगरवाल, प्रभारी आयुक्त, महापालिका
पाण्यासह शहरातील विविध महत्त्वाच्या प्रकल्पांसंदर्भात खासदार गिरीश बापट यांनी काल पुणे महापालिकेत आढावा बैठक घेतली. मेट्रो प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना, चांदणी चौकातील उड्डाण पूल, नदीसुधार योजना (जायका), नदीकाठसंवर्धन व विकसन या प्रकल्पांची अंमलबजावणी, भूसंपादन आणि त्यातील अडचणींबाबत त्यांनी चर्चा केली. पाण्याच्या वादावर तोडगा काढावा, ज्यामुळे पाणीकपात होणार नाही, याकडे अधिक लक्ष द्या, असा आदेश बापट यांनी दिला.

