पुण्यातील व्यापाऱ्याच्या खून प्रकरणी युवकास अटक

0 झुंजार झेप न्युज

सातारा प्रतिनिधी :
सातारा - पुणे येथील लक्ष्मी रस्त्यावरील शूज शोरूमचे मालक चंदन शेवानी यांच्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने छडा लावत आफ्रिदी रौफ खान (वय 23, रा. नाना पेठ, पुणे) याला लोणंद येथून अटक केली आहे.
चंदन शेवानी (वय 48, रा. परमारनगर, वानवडी, पुणे) यांचे शनिवारी (दि. 4) रात्री पुणे येथून अपहरण करण्यात येऊन पाडेगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीत घातक शस्त्राने वार करून आणि डोक्‍यात तीन गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.
शेवानी हे शनिवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांच्या नातेवाइकांनी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 5) पहाटे दाखल होती.
त्यानंतर काही वेळानेच त्यांचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. त्यांचा खून करून मृतदेह पाडेगाव येथे नीरा उजव्या कालव्यानजीक टाकण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासकार्य गतिमान केले होते.
सातारच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या निर्देशांनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ व आनंद साबळे यांनी तपास सुरू केला. या खून प्रकरणातील एक संशयित लोणंदमध्ये येणार असल्याची खबर वाघ यांना बातमीदाराकडून मिळाली होती.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री लोणंदच्या शास्त्री चौकात मोमीन बिल्डिंगजवळ सापळा लावला होता. त्या परिसरात रात्री दहा वाजता एक युवक संशयास्पदरित्या घुटमळताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी आपला खाक्‍या दाखवताच त्याने आपल्या तीन साथीदारांच्या साह्याने शेवानी यांचा खून केल्याची कबुली दिली. पाडेगाव येथे धारदार शस्त्राने वार केले आणि गोळ्या घालून खून केल्याचे त्याने सांगितले. आफ्रिदीला पुढील तपासासाठी पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या गुन्ह्यात आफ्रिदीचे तीन साथीदार सहभागी असून सातारा स्थानिक गुन्हे शाखा त्यांचा शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.