पिंपरी : 'व्हायरल व्हिडिओ'वरून भाजप-राष्ट्रवादीत जुंपली

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
पिंपरी - सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पिंपरी- चिंचवड शहराच्या महापौर माई ढोरे एका कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. त्या कार्यक्रमामध्ये महापौरांनी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली असून, त्यावरून विरोधी पक्षांसह सामाजिक संघटनांनीही महापौरांवर टीकेची झोड उठविली आहे. तर हा केवळ राजकीय स्टंट असून, माझ्या बदनामीचा हा प्रकार असल्याचा दावा महापौरांनी केला आहे.
स्त्री जातीला कलंक - नाना काटे
सांगवी येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महापौर माई ढोरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.
त्यांनी स्त्री जातीला कलंक लावण्याचे काम केल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना कोटे यांनी केला आहे.
सावित्रीबाई फुले यांच्याबाबत महापौर ढोरे यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून, त्यात महापौरांनी 'सावित्रीबाई फुले या इंग्रजांकडे धुणीभांडी करत होत्या' अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा खरपूस समाचार काटे यांनी घेतला आहे.
त्यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्धीस दिले असून, त्यात म्हटले आहे की, एक महिला असून सावित्रीबाईंसारख्या महान स्त्रीबाबत महापौरांनी केलेले वक्तव्य हे संपूर्ण स्त्री जातीला कलंक लावणारे आहे. अशा पद्धतीने वक्तव्य करणे चुकीचे आहे. ज्या सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, विशेषत: स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावले. अशा थोर समाजसुधार, कवियत्री व लेखिका यांच्याबद्दल शहराच्या प्रथम नागरिक या स्वतः महिला असताना करणे चुकीचे आहे. महापौरांनी यापूर्वी सर्वसाधारण सभेमध्येही राष्ट्रगीताचा अवमान केला होता. राज्यात अनेक भाजपचे वाचाळवीर आहेत, त्यांच्या पंगतीमध्ये आता पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर बसल्या आहेत का? असा प्रश्‍न यानिमित्ताने पडला असल्याचेही काटे म्हणाले.
माझ्या बदनामीचा डाव - महापौर ढोरे
भारतातील मुलींना शिक्षणाचे दार खुले करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रत्येक महिलेला अभिमान आहे. सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच मी शिक्षण घेऊ शकले आणि त्यांनी दिलेल्या अधिकारामुळेच आज महापौरपदापर्यंत पोहोचू शकले याचे मला पूर्ण भान आहे. परंतु माझ्या राजकीय बदनामीसाठी मी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केल्याचे पसरवले जात आहे. माझ्या राजकीय बदनामीसाठी सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा वापर करणे निंदनीय असल्याची टीका महापौर माई ढोरे यांनी केली.
महापौर ढोरे यांनी सांगवी येथील एका कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ढोरे यांनी 'सावित्रीबाई फुले या इंग्रजांकडे धुणीभांडी करत होत्या' असे म्हटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिवसभर महापौर या टीकेच्या धनी झाल्या होत्या. यावर महापौरांनी पत्रकारांशी संवाद साधत खुलासा केला.
त्या म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सांगवी येथे झालेल्या एका कार्यक्रमाला मी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा संदर्भ देऊन काही जण मी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केल्याचे पसरवत आहेत. हे माझ्या राजकीय बदनामीचे षड्‌यंत्र आहे. या देशातील कोणतीही महिला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी कधीच चुकीचे वक्तव्य करू शकत नाही. मीसुद्धा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच शिक्षण घेऊ शकले. नंतर राजकारणात त्यांच्यामुळेच प्रवेश करू शकले. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेमुळेच मी गेल्या 24 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.