अरविंद केजरीवालांच्या संपत्तीत वाढ; प्रतिज्ञापत्रातून उघड

0 झुंजार झेप न्युज

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संपत्तीत दीडपटीने वाढ झाली आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून केजरीवाल यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. केजरीवालांविरोधात तब्बल 65 जणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. केजरीवालांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्याकडे 3.40 कोटींची संपत्ती असल्याचा उल्लेख केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी 2015 मध्ये आपली संपत्ती 2.10 कोटी रुपये असल्याचे नमूद केले होते. त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत 50 टक्क्यांनी म्हणजे 1.03 कोटींनी वाढ झाली आहे. 9.65 लाख रुपयांची रोकड आणि मुदत ठेवी अरविंद केजरीवालांकडे आहेत.
2015 पासून केजरीवाल यांच्या स्थावर मालमत्तेत कोणतीही वाढ झालेली नाही. त्यांची स्थावर मालमत्ता 1.92 कोटी रुपये एवढी आहे. त्यांची पत्नी सुनिता केजरीवाल यांच्या नावे एक कोटींची संपत्ती आहे. सुनिता यांच्याकडे 57 लाखांची रोकड आहे. केजरीवालांच्या पत्नीने सरकारी नोकरीतून व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांना 32 लाख रुपये मिळाले होते.
अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून 65 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापैकी बहुतांश अपक्ष उमेदवार आहेत. भाजपकडून सुनील यादव, तर काँग्रेसकडून रोमेश सभरवाल निवडणूक लढवणार आहेत.
शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना सहा तास वाट पाहावी लागली होती. केजरीवाल अर्ज भरण्यासाठी सहकुटुंब दाखल झाले, तेव्हा त्यांना 45 नंबरचे टोकन देण्यात आले होते. अखेर संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांचा नंबर लागला होता. सोमवारीही निवडणूक अर्ज भरण्यासाठी केजरीवाल निघाले होते. परंतु रोड शोमध्ये तूफान गर्दी असल्यामुळे ते जामनगर हाऊसपर्यंत पोहचू शकले नव्हते. अखेर मंगळवारी केजरीवालांनी निवडणूक अर्ज दाखल केला.
केजरीवालांविरोधात स्थानिक टीव्ही वाहिनी 'पृथ्वी दर्शन'चे मालिक योगी माथुरही अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. केजरीवाल दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यास अपात्र असून राजकीय नेत्याने काय करायला हवे, हे आपण दाखवून देणार, असल्याचे माथुर म्हणाले. याशिवाय वकील, शिक्षकही केजरीवालांविरोधात निवडणूक लढवत आहेत. 50 पेक्षा जास्त उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत किंवा त्यांच्या पक्षाला अधिकृत मान्यता नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.