भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, लंकेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताना विराटने एक धाव घेत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने ११ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. १९६ डावांमध्ये विराटने ही कामगिरी केली असून यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगचा विक्रम मोडीत काढला.
आतापर्यंत ६ कर्णधारांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आलेला आहे. पाहूयात या यादीमधले इतर कर्णधार..
- विराट कोहली - १९६ डाव*
- रिकी पाँटींग - २५२ डाव
- ग्रॅम स्मिथ - २६५ डाव
- अॅलन बॉर्डर - ३१६ डाव
- महेंद्रसिंह धोनी - ३२४ डाव
- स्टिफन प्लेमिंग - ३३३ डाव
दरम्यान अखेरच्या टी-२० सामन्यातही भारतीय सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली.
दोन्ही सलामीवीर अर्धशतकी खेळी करुन माघारी परतल्यानंतर, मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. संजू सॅमसन, मनिष पांडे झटपट माघारी परतले. मात्र त्यानंतर विराटने मनिष पांडेच्या साथीने संघाचा डाव सावरला.


