त्रिवेणी नगर सिग्नल परिसरातील रस्त्यावर अतिक्रमण; टपरीधारकांविरोधात तात्काळ कारवाईची मागणी
पिंपरी चिंचवड : त्रिवेणी नगर सिग्नल परिसरात रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून काही टपरीधारकांनी बेकायदेशीररित्या व्यवसाय सुरू केल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना ईमेलद्वारे तसेच ‘सारथी हेल्पलाईन’वर नागरिकांकडून अनेक वेळा तक्रारी नोंदवण्यात आल्या. मात्र, संबंधित F क्षेत्रीय अधिकारी तसेच सारथी हेल्पलाईनमार्फत या तक्रारींकडे योग्य ती दखल घेतली जात नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
रस्त्यावर बेकायदेशीररीत्या व्यवसाय करणाऱ्या या टपरीधारकांविरोधात तत्काळ अतिक्रमण कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी केली आहे.
नगरपालिका आयुक्तांनी त्वरित हस्तक्षेप करून संबंधित विभागाला कारवाईचे निर्देश द्यावेत, अशीही त्यांनी विनंती केली आहे.

