साप हा सरपटणारा प्राणी आहे. सापांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचे हात अथवा पाय नसतात. उत्क्रांतीमध्ये त्यांचे हात व पाय हे केवळ सांगाड्यावरील भाग म्हणून राहिले आहेत. त्यांना हातपाय नसल्याने ते जमिनीवर नागमोडी आकारात सरपटतात.
भारतात प्रामुख्याने मानवी वस्तीत आढळणारे चार प्रमुख विषारी साप आहेत नाग, मण्यार, घोणस व फुरसे. घोणस सापाच्या दंशामुळे भारतात सर्वाधिक लोक मरतात. सर्पदंशावर निव्वळ एकमात्र उपाय म्हणजे सापाचे प्रतिविष. ह्या व्यतिरिक्त सर्प दंशावर दुसरा कोणताही उपाय नाही.
विषारी साप
नाग – भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो, तर काहींना शून्याचा आकडा (monoclour) असतो. असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्त आढळतात. नाग चावल्यानंतर सर्वांत पहिले प्रथमोपचार होणे गरजेचे आहे. प्रथमोपचारानंतर साप चावलेल्या माणसाला प्रतिविषाचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे. प्रतिविष हे विषाच्या रेणूंचा प्रादुर्भाव नाहिसा करते व शरीराच्या विषाचे रेणू शरीराच्या बाहेर काढायला मदत करते. विषाचे अंश शरीराच्या बाहेर पडेपर्यंत त्याचा प्रादुर्भाव रहातो. प्रतिविष हे देखिल नागाच्याच विषापासून बनवलेले असते
मण्यार – मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे. साधा मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार, व काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात. मण्यारच्या आणखी १० उपजाती आहेत. मण्यारचे विष नागाच्या विषाच्या १५ पटीने जहाल असते. मण्यारवर पाय पडल्याने मण्यार चावण्याच्या घटना घडतात. चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मण्यार चावल्यानंतर कधी कधी हा साप चावल्याचेही लक्षात येत नाही. प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते व श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. काही काळाने एरवी मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसनप्रणाली बंद पडून मृत्यू ओढवतो.
घोणस – घोणसाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पोटामध्ये अंडी उबवतो व पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्यानंतर बाहेर काढतो. त्यामुळे कित्येकांचा असा अपसमज आहे, की घोणस सस्तन प्राण्यांप्रमाणे पिल्लांना जन्माला घालतात. घोणस चावल्यानंतर जखमेभोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नये; असे केल्यास रक्त साखळून चावलेला भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. घोणस चावल्यानंतर लवकरात लवकर व्यक्तीला प्रतिविषाचे औषध देणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे.रुग्णास धीर द्यावा. अनेक वेळेस साप विषारी आहे की नाही हे माहीत नसते. अनेक वेळा घाबरून रुग्णाचा मृत्यू होतो. म्हणून रुग्णास मानसिक धीर देणे गरजेच आहे. त्या व्यक्तीस पाणी प्यायला देऊ नये.
चापडा – हा विषारी जातीतील साप आहे. हा साप हिरव्या रंगाचा असून हे लहान झुडपांच्या फांद्यांवर, वेलींवर रहातात. हा साप अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देतो.
फुरसे – महाराष्ट्रात कोकणात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात हे साप फार आहेत. हा भारतातील चार सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. हा साप भारतातील सर्वाधिक सर्पदंशांना आणि मृत्यूंना कारणीभूत आहे. या प्रजातीचे साप सरासरी १८ मिग्रॅ कोरडे विष निर्माण करू शकतात. फुरसे १५ ते २० मिग्रॅ विष टोचतो. एक प्रौढ व्यक्तीसाठी फक्त ५ मिग्रॅ डोस प्राणघातक असतो. या प्रजातीचे विष हिमोटॉक्झिक असते. म्हणजे ते मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या करायची क्षमता कमी होते आणि शरीरातून रक्तस्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्या मधून रक्त चालू होते, नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते. रक्त दाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी निष्क्रिय होऊन रुग्ण दगावतो.

