सोलापूर प्रतिनिधी :
सोलापूर : सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे- पाटील यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे कारवाई त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद देण्यासाठी बैठक घेऊन दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सात सदस्यांच्या संपर्कात राहिलाच्या आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच पुरुषोत्तम बरडेची प्रभारी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे, शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज आहेत . या नाराजीतून त्यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करत भाजपला साथ दिली. त्यामुळे सोलापुरातील शिवसेना कार्यकर्ते नाराज झाले असून याच पार्श्वभूमीवर "हा खेकडा शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा," अशी विनंती मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनी केली आहे. "उद्धव साहेब हा खेकडा तर सोलापूर व धाराशिवची शिवसेना पोखरत आहे. वेळीच नांग्या मोडा - निष्ठावंत शिवसैनिक," असे बॅनर सोलापूरमध्ये लावण्यात आले आहेत. यात तानाजी सावंत यांचा उल्लेख खेकडा असा करण्यात आला आहे. सोलापुरातील मेकॅनिक चौकात हा बॅनर लावण्यात आला आहे. हा बॅनर सोलापुरात सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीला धक्का देत भाजपला साथ दिली. आमदार तानाजी सावंत यांच्या गटातील सात सदस्यांनी भाजपा पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा दिला होता. यामुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची निवड झाली. या सर्व प्रकारामुळे आता तानाजी सावंत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण सावंत यांच्यावर पक्षविरोधी कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सावंत यांचं सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदही धोक्यात आलं असल्याचं बोललं जात आहे.

