मुंबई प्रतिनिधी :
मुंबई | काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. पाच दिवसानंतर अखेर काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना वडेट्टीवीरांची नाराजी दूर करण्यात यश आलं आहे. पदभार स्वीकारण्यास का उशीर केला यावर वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माझी नाराजी केवळ माझ्या पक्षावर नाही, तर माझ्या पक्षाकडे असलेलं खातं शिवसेनेकडे आहे. ते पक्षाला मिळालं पाहिजे. कारण त्या खात्याचा राज्यातील ग्रामीण जनेतचा संबंध आहे. मदत पुनर्वसन हे खातं संकटातील शेतकऱ्यास, अतिवृष्टीमुळे बेघर झालेल्यांसाठी व एकूण राज्यातील शेतकऱ्यापासून ते सामान्य माणसाची सेवा करणारं खातं आहे. ते खातं आमच्या वाट्याला यावं म्हणून मी मंत्रिपदाचा कार्यभार दोन दिवस उशिराने स्वीकारला असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
माझ्यापेक्षा या मंत्रिपदाचा उपयोग राज्यातील शेतकऱ्याला व सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे, ही त्या मागची माझी भूमिका होती. आज माझी चर्चा मल्लिकार्जुन खर्गे व वेणुगोपाल या दोघांशी देखील झाली आहे. दोघांनी सांगितलं आहे की, जे खातं शिवसेनेकडे आहे ते काँग्रेसकडे घेऊन तुम्हाला देऊ, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी बोलणी करुन दिली. त्यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर करण्यासाठी बाळासाहेब थोरातांना यश आलं.

