मुंबई प्रतिनिधी :
मुंबई | शिवसेना आमदार अब्दूल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याच्या नाराजीवरुन सत्तारांनी हा निर्णय घेतला असल्याचं समजत आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अब्दुल सत्तार यांनी नेमकं कोणत्या कारणासाठी राजीनामा दिला हे मला समजू शकलेलं नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते. पाच दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. आता खातेवाटपापूर्वीच सत्तारांनी राजीनामा दिल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे.
मंत्रिमंडळात कोणतेही खाते वजनदार किंवा कमी वजनाचे नसते. मिळेल त्या खात्यामध्ये चांगले काम करता येते. पण तरीही खातेवाटपाला उशीर का होतोय हे मला माहित नाही, असंही राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत आले होते. सत्तार यांनी औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली होती.

