देवेंद्र फडणवीस तुम्ही सत्ता गमावली की स्वनियंत्रण ? असा सवाल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियासमोर जेएनयू हिंसाचाराविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान सोमवार संध्याकाळी एक मुलगी हातात 'फ्री काश्मीर' असं लिहिलेलं पोस्टर घेऊन उभी होती. हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी टीका केली.
त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या नाकाखाली लागणारे 'फ्री काश्मीर'चे फलक कसे खपवून घेतात? असा सवाल करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केले होते. फडणवीस यांच्या या ट्वीट ला आता मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. तुमच्यासारखे जबाबदार नेते शब्दांचे भलते अर्थ लावून जनतेची दिशाभूल कशी करु शकतात, असा प्रश्न पाटील यांनी ट्वीट करत विचारला आहे.
‘देवेंद्रजी, 'काश्मीर मुक्त करा' याचा अर्थ काश्मीर भेदभावापासून, नेटवर्कवरील बंदीपासून आणि केंद्रीय अंकुशापासून मुक्त करा. तुमच्यासारखे जबाबदार नेते शब्दांचे भलते अर्थ लावून देशात तिरस्कार निर्माण करत आहेत, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, यावर माझा विश्वासच बसत नाही. सत्ता गमावल्यामुळे हे होत आहे की तुम्ही स्वनियंत्रण गमावून बसला आहात का ?' असा प्रतिप्रश्न करत जयंत पाटलांनी ट्वीट केले आहे.
दरम्यान पाटील यांच्या ट्वीटला पुन्हा फडणवीस यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. 'तुमची दया येते! आता फुटीरतावादी वृत्तीला सरकारी वकील मिळाला. जयंतराव, हे वोट बँकेचं राजकारण तुमच्याकडून अपेक्षित नाही. काश्मीर आधीच भेदभावापासून मुक्त आहे. फक्त सुरक्षेच्या कारणास्तव काही दशकांपासून निर्बंध आहेत. सरकारमध्ये असो किंवा विरोधीपक्षात, आमचं एकच तत्त्व 'राष्ट्र सर्वप्रथम' असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

