अकोला - प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्यावर अकोट शहरातील पोलीस वसाहतींमध्ये शुक्रवारी रात्री गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. घटनेनंतर त्यांना तत्काळ अकोला येथे हलविण्यात आले होते. परंतु रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर हे त्यांच्या खुमकर दूधडेअरीच्या बाहेर शुक्रवारी रात्री दहा ते साडे दहाच्या सुमारास मोबाइलवर बोलत आले. या ठिकाणी दोन दुचाकीस्वार त्यांच्याकडे येत असल्याचे त्यांना दिसले. त्यांना हल्ल्याची कुणकुण लागताच ते पोलीस वसहतीकडे पळाले.
मात्र, हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाठीमागून गोळीबार केला. त्यामुळे जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने पोलीस कर्मचाऱ्यांनी समोर असलेल्या डॉ. सुरेश व्यवहार यांच्या रुग्णालयात भरती केली.
मात्र डॉक्टरांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. या ठिकाणी त्यांची प्रकृती बिघडल्याने आणि रक्तस्त्राव झाल्याने त्यांना अकोला येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, काल रात्रीपासून आकोट येथे मोठा बंदोबस्त लावण्यात आला. पालकमंत्री बच्चू कडू हे रात्रीपासूनच जिल्ह्यात दाखल झाले असून, ते आकोट येथे आहेत.

