कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या आलिशान बंगल्यावर जेसीबी

0 झुंजार झेप न्युज


कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी नागपूरचे आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महिन्याभराच्या आतच पहिली मोठी कारवाई केली आहे. नियमबाह्य, अनधिकृत बांधकामांना अजिबात थारा न देणाऱ्या मुंढेंच्या आदेशानंतर नागपूरमधील सराईत गँगस्टर असलेल्या संतोष आंबेकरच्या अलिशान बंगल्यावर हातोडा पडला आणि बंगला जमीनदोस्त करण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे.
इतवारी परिसरातील आंबेकरच्या या बंगल्यामधून अनेक काळे धंदे चालायचे असं बोललं जातं. त्याने अनेक गुन्ह्यांसाठी या बंगल्याचा वापर केला. मारहाण करणे, खंडणीसाठी छळ करणारे, तरुणींविरोधातील गुन्ह्यांसाठी आंबेकर याच बंगल्याचा वापर करायचा.

ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी आंबेकरविरोधात कारवाईला सुरुवात केली आणि १२ ऑक्टोबरला त्याला अटक केली. त्याच्याविरोधात मारहाण, खंडणी, बलात्कार यासारखे १८ हून अधिक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
नागपूर पोलीस आंबेकरविरोधात चौकशी सुरु केली असून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोक्का) त्याच्याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच आता आंबेकरच्या नावे असणारी अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त करण्याचे काम सुरु झाले आहे. मागील अनेक महिन्यापासून आंबेकरचा हा अलिशान बंगला पाडण्याची चर्चा शहरामध्ये सुरु होती. मात्र पालिकेमधून यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतला जात नव्हता. काही दिवसांपूर्वीच मुंढे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमधील चर्चेदरम्यान नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आयुक्तांना आंबेकर प्रकरणाची माहिती दिली. तसेच त्याचा अनधिकृत बंगला पाडण्याची कारवाई महापालिकेच्या कारभारामुळे अडकून पडल्याचेही मुंढेंना सांगितले.
मुंढे यांनी संपूर्ण प्रकरण समजून घेतल्यानंतर तातडीने आंबेकरचा बंगला पाडण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी (२५ फेब्रुवारी) महापालिकेच्या अतिक्रम विरोधी पथकाने बंगला पाडण्यास सुरुवात केली आहे. आंबेकरच्या या बंगल्याची किंमत काही कोटींमध्ये असल्याचे सांगितले जाते. बंगल्याच्या बाहेरील भागाला सजवण्यासाठी वापरण्यात आलेला जयपुरी गुलाबी दगडाचे काम पाहूनच बंगल्याच्या किंमतीचा अंदाज बांधता येतो. तीन जेसीबी आणि एक पोकलॅण्डच्या मदतीने हा बंगला पाडण्याच्या कारवाईला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
धडक कारवाईसाठी मुंढे कायमच चर्चेत
तुकाराम मुंढे हे नियमांची कठोर अंमलबजावणी करणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी कधीही नियमबाह्य गोष्टींना थारा दिलेला नाही. त्यामुळेच राजकरण्यांना ते नेहमीच खुपतात असं बोललं जातं. आतापर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागांमध्ये त्यांची बदली झाली असून, त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. नियमबाह्य, अनधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या मुद्दावरुन त्यांचा नेहमीच राजकारण्यांबरोबर संघर्ष झाला आहे. नाशिक महापालिका असो किंवा नवी मुंबई महापालिका नेहमीच सर्वपक्षीय राजकारणी त्यांच्याविरोधात एकत्र आल्याचे दिसले आहे. राजकारण्यांच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे ही तुकाराम मुंढे यांची खासियत आहे. त्यामुळेच राजकारण्यांना जरी ते नकोस वाटत असले तरी, सर्वसामान्यांमध्ये ते लोकप्रिय आहेत. काही ठिकाणी तुकाराम मुंढे यांची बदली रोखण्यासाठी सर्वसामान्य जनतेने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.