वास्को: कारवार, कर्नाटक येथून विक्रमादित्य या नौदलाच्या जहाजावरून प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतलेल्या 'मीग २९के' लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी (दि.२३) सकाळी १०.३० वाजता गोव्यातील खोल समुद्रात कोसळले. विमानात तांत्रिक बिघाड होऊन ते समुद्रात कोसळणार असल्याची वैमानिकाला वेळेवरच जाणीव झाल्याने त्यांने पॅराशूटची मदत घेऊन विमानातून उडी घेतल्याने या दुर्घटनेतून तो सुखरूप बचावला. सदर दुर्घटनेतून बचावलेल्या वैमानिकाची प्रकृती सुखरूप असल्याची माहिती संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी मिहूल कार्निक यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
रविवारी सकाळी १०.३०च्या सुमारास सदर घटना घडली.
कारवार येथून नौदलाच्या 'मीग २९के' लढाऊ विमानाने उड्डाण घेतल्यानंतर ते गोव्याच्या क्षेत्रात असताना अचानक विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाला जाणवले. घटना घडण्यापूर्वी विमान गोव्यातील समुद्राच्या वरून उड्डाण घेत असून, तांत्रिक बिघाडामुळे ते कोसळणार असल्याची जाणीव वैमानिकाला झाल्याने त्यांने त्वरित विमानातून उडी घेतली. यानंतर सदर विमान गोव्याच्या समुद्रात कोसळले.
सदर विमान समुद्रात कुठे कोसळले याबाबत अजून स्पष्ट माहिती सामोरे आली नसली तरी गोव्यात असलेल्या बेतूल भागाच्या जवळ असलेल्या समुद्रात सदर विमान कोसळलेले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी मिहूल कार्निक यांना संपर्क केला असता समुद्रात दुर्घटनाग्रस्त झालेले ते विमान रविवारी (दि.२३) घटनेपूर्वी वैमानिकासहीत प्रशिक्षणाकरिता उड्डाणावर गेल्याची माहिती दिली. समुद्रात कोसळलेल्या 'मीग २९के' विमानातील वैमानिकाला नंतर समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून त्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती कार्निक यांनी दिली. सदर विमान कशामुळे कोसळले याची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली असून, याबाबत चौकशीला सुरुवात झाल्याची माहिती मिहूल कार्निक यांनी शेवटी दिली.तीन महिन्यात गोव्यात नौदलाचे दुसरे 'मीग २९के' लढाऊ विमान कोसळण्याची ही घटनारविवारी (दि.२३) सकाळी गोव्याच्या समुद्रात 'मीग २९के' लढाऊ विमान कोसळले असून, मागच्या तीन महिन्यांतील 'मीग २९के' दुर्घटनाग्रस्त होण्याची गोव्यातील ही दुसरी घटना आहे. १६ नोव्हेंबर २०१९ला सकाळी गोव्याच्या 'आयएनएस हन्सा' नौदलाच्या उड्डाण क्षेत्रातून नेहमीप्रमाणे कवायतीसाठी उड्डाण केलेल्या 'मीग २९के' लढाऊ विमानाच्या इंजिनात पक्षी घुसल्याने विमानाला आग लागून ते खडकाळ पठारावर जाऊन कोसळले होते.या विमानाला पक्षी आपटून इंजिनात घुसल्याने आग लागल्याचे वैमानिक कॅप्टन एम शोकंद व सहवैमानिक लेफ्टनंट कमांडर दीपक यादव यांना समजताच त्यांनी पॅराशूटचा वापर करून विमानातून उड्या घेतल्याने ते त्या दुर्घटनेतून सुदैवाने बचावले होते. विमानाच्या इंजिनाला आग लागून ते अपघातग्रस्त होणार असल्याचे वैमानिकांना समजल्यानंतर त्यांनी ते लोकवस्ती नसलेल्या अशा गोव्यातील लोटली गावाच्या देवापाज याभागातील खडकाळ पाठाराच्या बाजूने नेल्यानंतर वैमानिकांनी विमानातून उड्या घेतल्याने त्या घटनेत कदाचित होणार असलेली महाभयंकर घटना टळल्याने सदर वैमानिकांचे तेव्हा अनेकांकडून कौतुक करण्यात आले होते.