माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपा खासदार कपिल पाटील यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनासाठी भिवंडीत आले होते.

''शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतेमंडळी केवळ सत्तेसाठी आणि पदासाठी एकत्र आलेली आहे. पदासाठी पैसा आणि पैशासाठी पद हे समीकरण आताचे सत्ताधारी तयार करत आहेत,'' असा टोला नारायण राणे यांनी लगावला. मात्र भविष्यात उद्धव ठाकरे भाजपासोबत आल्यास त्याला विरोध करणार का? अशी विचारणा केली असता नारायण राणे यांनी जो पक्षाचा निर्णय असेल. तोच आपला निर्णय असेल असे सांगितले.
मुख्यमंत्रिपदावरून भाजपासोबत वाद झाल्यानंतर शिवसेना महायुतीमधून बाहेर पडली होती. तसेच शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी करून सरकार स्थापन केले होते. मात्र हे सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपाकडून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. तसेच हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावाही भाजपाच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे.

