जळगाव : कौशल्य विकास प्रशाळा तसेच उद्योजकता विकास मंचातर्फे जळगावातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात'उडान : संजीवनी नव-उद्योजकांसाठी' या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षही उपस्थित होते.
यावेळी सुप्रिया सुळे यांना दिल्लीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या 48 खासदारांपैकी आवडतं कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं सुप्रिया सुळे यांनी उत्तर देताना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आणि जळगावचा आवाज संसदेत मांडणाऱ्या रक्षा खडसे, आपल्या आवडत्या महिला खासदार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.
48 खासदारांमध्ये सुसंस्कृत आणि अभ्यासू असलेल्या रक्षा खडसे या माझ्या आवडत्या महिलाखासदार आहेत. धडपड करणारे नेतृत्त्व म्हणून मला त्यांचं कौतुक वाटतं, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी भाजप खासदार रक्षा खडसेंवर स्तुतिसुमने उधळली. रक्षा खडसे या सलग दुसऱ्यांदा जळगावातून लोकसभेच्या खासदारपदी निवडून आल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांनी महाविद्यालयाच्या 'सेंटर फॉर मास मीडिया अँड फॉरेन लँग्वेज' विभागाला भेट देत स्टुडिओची रचना समजून घेतली. तसेच न्यूज अँकर म्हणून बातमी दिली. विशेष म्हणजे न्यूज अँकर म्हणून बातमी देताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बातमी वाचली.

