औरंगाबाद : घरगुती वादातून कन्नड येथील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या आईने सुनेविरुद्ध, अर्थात रावसाहेब दानवे यांच्या मुलीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, हर्षवर्धन जाधव यांची आई तेजस्विनी जाधव या समर्थनगर येथे कुटुंबासोबत राहतात. त्यांनी गुरुवारी दुपारी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. त्या तक्रारीत त्यांची सून व हर्षवर्धन जाधव यांची पत्नी संजना यांनी शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. संजना जाधव यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कन्नड येथील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा विवाह केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना यांच्यासोबत झालेला आहे. जाधव व दानवे या दोन कुटुंबीयांत यापूर्वी कलह झालेला होता. वैयक्तिक पातळीवर हर्षवर्धन जाधव व रावसाहेब दानवे यांच्यातील संबंधही बरेच बिघडले होते.
हर्षवर्धन जाधव यांच्या आई तेजस्विनी जाधव यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या दालनात जात त्यांनी सुनेविरुद्ध धमकावणे शिवीगाळ केल्याची तक्रार दिली. या प्रकरणात पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकून दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.

