मुंबई | कोरोनाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा धोका टाळण्यासाठी राज्य शासनाने काही नियमावली तयार केली आहे.
आज रात्री 12 पासून मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवडमध्ये जिम, सिनेमा हॉल, जलतरण केंद्र आणि मॉल्स बंद राहणार आहेत. तसंच कोणत्याही कारणाने गर्दी टाळण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. विधानसभेत ही माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसंच पुढील अधिसूचना निघणार नाही तोपर्यंत हे आदेश लागू असतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्यात आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. पुण्यातला कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 10 वर जाऊन पोहचला आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. दुसरीकडे 311 संशयित रूग्ण देखील देखरेखीखाली असल्याचं आयुक्त म्हैसकर यांनी सांगितलं आहे. पुणेकरांनी घाबरून जाण्याचं कारण नाही मात्र काळजी घेणं अत्यावश्यक असल्याचं म्हैसकर म्हणाले..

