मुंबई : मुंबई माथाडी कामगार सुरक्षा कल्याण मंडळाच्या मुदत ठेव रकमेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी २२ जणांना अटक करण्यात आली असून, संबंधितांवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य सुनील प्रभू यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. गृहमंत्री म्हणाले, १०० कोटींच्या मुदत ठेव रकमेतून ९० कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला. आता त्यापैकी १८ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. संपूर्ण रक्कम वसूल करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचे गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांच्या कल्याणाची जबाबदारी असलेल्या ३ हजार कामगार मंडळाच्या व्यवस्थापनाने १०० कोटी रुपयांचा अपहार केला होता.
त्यावर कोणतीही कारवाई होत नाही, असा प्रश्न सुनील प्रभू व राधाकृष्ण विखे यांनी विचारला होता. त्यावर बोलताना गृहमंत्री देशमुख म्हणाले, या कामी स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया व बँक आॅफ बडोदा या तीन बँकांत माथाडी कामागारांच्या विविध पाच मंडळांच्या १०० कोटींच्या ठेवी होत्या. त्या बनावट कागदपत्रे बनवून बँकेचे मॅनेजर निखील रॉय यांच्यासह २२ जणांनी अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी १५ फ्लॅटही ताब्यात घेण्यात आले आहेत.

