मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात अयोध्येचा दौरा केला. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेच्या वतीनं एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली. ठाकरे यांच्या या दौऱ्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले होते. पाटील यांच्या टीकेचा शिवसेनेनंही समाचार घेतला असून, चंद्रकांत पाटलांना उपदेशाचे डोस दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर टीका करताना भाजापाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ''माझी छाती फाडली तर त्यात श्रीराम दिसतील,'' असं म्हटलं होतं. याला शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे.
छात्या बडवणं बंद करा, श्रीरामाला त्रास होईल-
"'शिवसेनेने भाजपचा त्याग केलाय, हिंदुत्वाचा नाही.' या एका ठोशाने उद्धव ठाकरे यांनी सगळय़ांचेच दात घशात घातले. हा ठोसा मारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जागा निवडली ती अयोध्येची. अयोध्या म्हणजे कुणा एखाद्याची मक्तेदारी नाही. कुणी सरकार स्थापनेसाठी इकडे गेला काय, किंवा तिकडे गेला काय? रामावर ज्यांची श्रद्धा त्या सगळय़ांचीच अयोध्या. कैकयीमुळे श्रीराम वनवासात गेले, पण तिचा पुत्र भरत हा रामभक्त होता. तशी विचारधारा कुठलीही असली तरी ती रामभक्तीआड येऊ शकत नाही. पुन्हा फक्त वाल्याचे वाल्मीकी बनविण्याचे वॉशिंग मशीन राजकारणात आणले म्हणजे 'रामायण' समजले असे होत नाही. राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते. राज्यातील विरोधकांकडे त्याची वानवा आहे. म्हणूनच 'ठाकरे सरकार'च्या अयोध्यावारीवर ते छात्या बडवीत आहेत. तुमच्या छातीत खरंच राम असेल तर छात्या बडवणे बंद करा. श्रीरामाला त्रास होईल," असा सल्ला शिवसेनेनं भाजपाला दिला आहे.

