पिंपरी (zunjarzep. In):- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेला रूपीनगरचा परिसर सध्या प्रचंड धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील सर्वाधिक ३६ रूग्ण याच परिसरात आढळले होते. त्यामुळेच रूपीनगर ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र या परिसरात सोशल डिस्टसिंगची पुरती वाट लागली असल्याचे धक्कादायक चित्र आज (दि०४) समोर आले आहे. पोलीस प्रशासनाकडून या परिसरात कडक बंदोबस्त अपेक्षित असताना देखील दुर्लक्ष केल्यामुळेच मोठ्या संख्येने नागरिकांची रस्त्यावर गर्दी होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
राज्यासह देशावर कोरोनाचं संकट ओढवले आहे. पिंपरी चिंचवड शहरात आजवर १२१ कोरोनाचे ‘पॉझिटिव्ह’ रूग्ण सापडले आहेत. त्यापैकी शहरातील ‘हॉटस्पॉट’ ठरलेला रुपीनगर परिसरात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे ३६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळेच महापालिका प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुपीनगरसह शहरातील २१ भागांचा परिसर ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून घोषित केला आहे. मात्र नागरिकांना या आपत्तीचे गांभिर्य नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर नागरिकांची गर्दी झाल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. परंतू रूपीनगर परिसरात प्रशासनाने लागू केलेले सर्व निर्बंध धाब्यावर बसवत नागरिकांनी आज रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. सोशल डिस्टसिंगची पुरती वाट लागल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरात प्रशासनाने जाहिर केलेल्या ‘कंटेनमेंट झोन’मध्ये नागरिकांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. त्यात अशा प्रकारे काही बेजबाबदार नागरिक रस्त्यावर येत असल्यामुळे कोरोनाचा धोका वाढणार आहे. म्हणूच पोलीस प्रशासनाने यावर कडक भूमिका घेऊन रस्त्यावर बेजबाबदारपणे फिरणार्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिक करत आहेत.
