कार्यकर्ते सोबत राहावे म्हणून विरोधकांना 'सरकार पडणार'चं गाजर दाखवावं लागतं : अजित पवार

0 झुंजार झेप न्युज

 

कार्यकर्ते सोबत राहावे म्हणून विरोधकांना 'सरकार पडणार'चं गाजर दाखवावं लागतं : अजित पवार


कराड : विरोधकांना नेहमी कार्यकर्ते सोबत राहण्यासाठी सरकार पडणार असं म्हणावंच लागतं. कायम कार्यकर्त्यांना गाजर दाखवावं लागतं. शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांनी ही महाविकास आघाडी निर्माण केली आहे, यांचे आशीर्वाद आहे तोपर्यंत सरकार मजबूत आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते कराडमध्ये बोलत होते.


यावेळी ते म्हणाले की, चंद्रकांतदादा पाटील यांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडली. आम्ही स्वप्नं पाडण्याचं काम करत नाही, आम्ही कृती करणारी माणसं आहोत, असं अजित पवार म्हणाले. 105 आमदार असताना सरकार बनवता आलं नाही हे त्याचं खरं दुखणं आहे, म्हणून सारख्या काट्या पेटवतात असा टोला देखील अजित पवारांनी लगावला.


अजित पवार यावेळी म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार काम करत आहे. प्रवेशाबाबत लवकरच जी आर काढला जाणार आहे, दोन दिवसात यावर निर्णय घेऊ असं ते म्हणाले.


शिवसेना आमदार सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईसंदर्भात ते म्हणाले की, ईडीच्या कारवाई दरम्यान केंद्र सरकार कशा पद्धतीने, कुठल्या फोर्सची मदत घेतात हा त्यांचा निर्णय असतो. पवार साहेब यांनी या कारवाई बाबत मत व्यक्त केलं आहे.


वीज बिलाच्या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, या संदर्भात अभ्यास सुरू आहे. 59 हजार कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. गेल्या सरकारमुळे महावितरण अडचणीत आले आहे, असा आरोप देखील अजित पवारांनी केला.


कोरोनात राज्याची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. 29 हजार कोटी रुपये केंद्राकडून येणं बाकी आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवून देखील नैसर्गिक संकटात केंद्र राज्याच्या पाठीशी उभा राहीलं नाही. केंद्राने सर्व राज्यांना देश म्हणून समान वागणूक दिली पाहिजे, ती सध्या दिसत नाही. आपल्या पक्षाचे सरकार नाही म्हणून निधी देताना भेदभाव होतो, असा आरोपही अजित पवारांनी केला आहे.


मदत पुनर्वसनला 2 हजार कोटींचा पुढचा हप्ता देणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.