रोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार? चर्चेअंती निर्णयाची शक्यता

0 झुंजार झेप न्युज

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार? चर्चेअंती निर्णयाची शक्यता


यंदाचं हिवाळी अधिवेशन यंदा नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले याबाबत सरकार आणि विरोधी पक्षाशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

नागपूर: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील अनेक महत्वाच्या बैठका, कार्यक्रम, सण, उत्सव नेहमीप्रमाणे होऊ शकलेले नाहीत. नागपूरमध्ये होणारं हिवाळी अधिवेशनही मुंबईत घेण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोना संकटामुळे बिझनेस अॅडव्हायजरी कमिटीच्या बैठकीलाही उशीर झाला होता. हिवाळी अधिवेशनाची तयारी करण्यासाठी कोरोनामुळे वेळ मिळत नाही, त्यामुळे यंदा हे अधिवेशन मुंबईत घेतलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदाचं हिवाळी अधिवेशन यंदा नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले याबाबत सरकार आणि विरोधी पक्षाशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर नागपूरचं आमदार निवास कोविड सेंटर म्हणून वापण्यात आलं होतं. त्यामुळे याठिकाणी राहण्यास काही आमदार विरोध करत असल्याचंही बोललं जात आहे.

महत्वाची बाब म्हणजे नागपूरला अधिवेशन घेण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा मुंबईवरुन आणि अन्य जिल्ह्यांमधून नागपूरला हलवाली लागते. कोरोना संकटात इतक्या लोकांची व्यवस्था कशी होणार? हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, 7 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु होईल, असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं होतं. तसंच अधिवेशनादरम्यान कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी विधिमंडळात निगेटिव्ह प्रेशरची सोय करण्यात आली आहे, अशी माहितीही पटोले यांनी दिली. पण आता कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन मुंबईला होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निगेटिव्ह प्रेशर म्हणजे काय?

निगेटिव्ह प्रेशर ही संसर्ग नियंत्रणाची एक सामान्य पद्धत आहे. गोवर, क्षयरोग तसेच कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारात रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.

निगेटिव्ह प्रेशर रुमला नकारात्मक दाब खोल्या असे म्हणतात. या खोलीत हवेचा दाब हा बाहेरील हवेच्या दाबापेक्षा कमी असतो. त्यामुळे त्या रुमचा दरवाजा उघडल्यानंतर बाहेरुन येणारी दूषित हवा आणि इतर दूषित कण आत येत नाही.

त्याऐवजी दूषित नसलेली किंवा फिल्टर केलेले हवा त्या रुममध्ये जाते. ही दूषित हवा खोलीच्या बाहेर काढून एक्झॉस्ट सिस्टमसह बाहेर सोडली जाते. ज्यामुळे स्वच्छ हवा रुममध्ये असते.

नागपूर जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती

नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना पाहायला मिळत आहे. कारण, जिल्ह्यातील कोविड सेंटरमधील 66.72 टक्के खाटा रिकाम्या आहेत. 34 खासगी कोविड रुग्णालयात एकही कोरोनारुग्ण नाही. तर 39 कोविड रुग्णालयांमध्ये 10 पेक्षा कमी रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 301  नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 331 रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. जिल्ह्यातील अॅक्टिव कोरोना रुग्णांची संख्या आता 3 हजार 598 इतकी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.