पिं. चिं. पालिका आयुक्तांवर ‘कोणाचं? एवढं प्रेम ऊतू चाललंय’…
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याविरुद्ध अनेकदा सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत. पारदर्शकपणे प्रशासन न चालविणे, भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर कारवाई न करणे, सारथीवरील तक्रारी विना कार्यवाही बंद करण्याबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न करणे, बेकायदेशीर व धोकादायक स्पीडब्रेकर्स दुरुस्त करण्याबाबत वा काढून टाकण्याबाबत कारवाई न करणे अशा अश्या असंख्य बाबी आहेत, जेथे भ्रष्ट व कामचुकार पालिका प्रशासनावर आयुक्तांचा वचक राहिलेला नाहीये. राज्य शासनाने तातडीने हर्डीकरांची बदली करून, डॉ. श्रीकर परदेशी किंवा तुकाराम मुंढेंसारखे धडाडीचे, प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी येथे आयुक्त म्हणून पाठवावेत.
हर्डीकर हे कोरोनाच्या गंभीर विषयातही पुरेश्या गांभीर्याने नागरिकांनी सुचविलेल्या बाबींवर लक्ष देताना दिसत नाहीत. कंटेनमेंट झोनमध्ये प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या व्हिटॅमिन सी च्या गोळ्यांचे मोफत वाटप, शेतकऱ्यांसाठी मोकळी मैदाने भाजीपाला विक्रीसाठी राखीव करणे, सर्वत्र सरकारी शाळा, हॉस्पिटल, मोहल्ला क्लिनिक यांचे नियोजन, त्यासाठीची बजेट तरतूद, पारदर्शक कारभार, कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई कशाकडेच त्यांचे लक्ष दिसत नाही.
करोनासंबंधीच्या तसेच इतर विविध खरेदीत मोठे भ्रष्टाचार झाल्याचे अनेक आरोप गेल्या काही वर्षांत झालेले आहेत. याची एसीबीकडून चौकशी करावी व या दोषींवर आयुक्तांसकट गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी व पारदर्शक प्रशासन देण्यास असमर्थ ठरल्याबद्दल आयुक्त श्रावण हर्डीकर यांची पिंपरी चिंचवड आयुक्त पदावरून तातडीने बदली करावी
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रशासनावर मजबूड पकड आहे. एखाद्या भ्रष्ट, निष्क्रीय, कामात कुचराई करणारा अधिकारी दादांच्या नजरेतून कधीच निसटत नाही. त्यात पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, सोलापूर महापालिका आयुक्त दीपक तावरे यासह अन्य अधिका-यांच्या अचानक तडकाफडकी बदली करण्यात आल्या. मग पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्यावर कोणाचं, एवढं प्रेम ऊतू चाललंय की, तीन वर्षे कार्यकाळ संपूनही अजून त्यांची बदली होत नाही. आजपर्यंत सत्ताधारी भाजपने महापालिका तिजोरी लुटून खाल्ली, चुकीच्या कामांना मुभा दिली. भ्रष्ट अधिका-यांना पाठिशी घातले. तरीही आयुक्तांची बदली होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोरोना महामारीच्या काळातही विविध निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार सुरु आहे, एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे महापालिकेची तिजोरी रिकामी पडू लागली आहे. वैद्यकीय साहित्य व उपकरण खरेदीतील लाचखोर अधिका-यावर कारवाई अद्याप झालेली नाही. डाॅक्टराची अपुरी संख्या असूनही कोविड सेंटरची जबाबदारी काढून प्रशासकीय जबाबदारी सोपविली जात आहे.
