निवार' उद्या तामिळनाडूत धडकणार, किनारी प्रदेशात हाय अलर्ट जारी

0 झुंजार झेप न्युज

 

'निवार' उद्या तामिळनाडूत धडकणार, किनारी प्रदेशात हाय अलर्ट जारी

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निवार चक्रीवादळ तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारी भागात धडकणार आहे. राज्य सरकारने याचा सामना करण्यासाठी तयारी सुरु केली असून एनडीआरएफच्या सहा टीमही तामिळनाडूच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.


चेन्नई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने भीषण चक्रीवादळ 'निवार' तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या पूर्व किनाऱ्यावर उद्या 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत धडकण्याची शक्यता आहे. 120 किमी प्रति तास इतक्या वेगाने येणाऱ्या या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या सहा टीम तामिळनाडूतील कुड्डालोर आणि चिदंबरम परिसराकडे रवाना झाल्या आहेत.


'निवार' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने किनारी प्रदेशात हाय अलर्ट जाहीर केला असून संबंधित सात जिल्ह्यातील प्रशासनाला तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचसोबत संबंधित जिल्हात मंगळवारपासून आंतर जिल्हा बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणच्या रेल्वे सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशातही रॉयल सीमा क्षेत्र आणि इतर किनारी भागात पुढच्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.





'निवार' चक्रीवादळाचा वेग पाहता ते वेळेच्या आधीच तामिळनाडूच्या किनारी प्रदेशात धडकण्याची शक्यता आहे. वायव्य दिशेने येणारे हे चक्रीवादळ तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारी प्रदेशात धडकणार आहे.


जागतिक हवामान संघटनेच्या नियमांनुसार या चक्रीवादळाचे 'निवार' हे नाव इराणने सुचवले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तयार झालेल्या 'निवार' चक्रीवादळामुळे येत्या दोन दिवसात तामिळनाडूच्या किनारी भागात मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने मासेमारी करणाऱ्यांना या परिसरात जाऊ नये असे निर्देश दिले आहेत.


मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी एक आढावा बैठक घेऊन प्रशासनाला पूर्णपणे अलर्ट राहण्याची सूचना दिली आहे. खासकरुन पुडुकोटई, कुड्डालोर, नागपट्टनम, तंजावर, विल्लुपुरम आणि चेंगलपट्टु या जिल्ह्यांतील प्रशासनाला 'निवार' चा सामना करण्यासाठी तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत बातम्यांचा आधार घ्यावा असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर चर्चा केली असून आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.