अर्णब गोस्वामींना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, जामीन अर्ज फेटाळला!

0 झुंजार झेप न्युज

 

अर्णब गोस्वामींना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, जामीन अर्ज फेटाळला!

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्णब गोस्वामी यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला आहे.


मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह नितीश सारडा आणि फिरोज शेख यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्णब गोस्वामी आणि इतर दोघांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला आहे. नियमाप्रमाणे जामीनासाठी आधी सत्र न्यायालयात याचिका करावी असे निर्देश उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना दिले आहेत. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.


एखादा आरोपी न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हा हायकोर्ट त्यात हस्तक्षेप करुन ती अटक बेकायदेशीर ठरवून त्याला जामीन देऊ शकत नाही, असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला होता. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने निकालाचं वाचन केलं. अर्णब गोस्वामी आणि इतर दोन आरोपींनी जामीनासाठी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज करावा. नियमानुसार त्या कोर्टातून मग हायकोर्टाचा पर्याय त्यांच्यासाठी खुला राहिल, असे निर्देश हायकोर्टाने दिले.

दरम्यान उच्च न्यायालयात सुनावणी होण्याच्या अर्धा ते एक तासापूर्वी अर्णब गोस्वामी यांनी जामीनासाठी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पुढील चार दिवसात निकाल देण्याचे निर्देश हायकोर्टाने सत्र न्यायालयाला दिले आहेत. चार दिवसात सत्र न्यायालयात सुनावणी झाली नाही तर अर्णब गोस्वामी तळोजा कारागृहातच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळणार की त्यांची  दिवाळी तुरुंगातच साजरी होणार हे अलिबाग सत्र न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामींना अटक
पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.