एका तासात एसटी कर्मचाऱ्यांचे एका महिन्याचे वेतन देणार : अनिल परब

0 झुंजार झेप न्युज

 

एका तासात एसटी कर्मचाऱ्यांचे एका महिन्याचे वेतन देणार : अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांना लगेच एका महिन्याचं वेतन देणार, सणासाठी कर्मचाऱ्यांना अग्रिम रक्कम तात्काळ देणार आहोत, अशी परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली आहे.

एसटीच्या एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेनं आज राज्यभर आक्रोश आंदोलन केलं.


मुंबई :  एसटी कर्मचाऱ्यांना लगेच एका महिन्याचं वेतन देणार, सणासाठी कर्मचाऱ्यांना अग्रिम रक्कम तात्काळ देणार आहोत, अशी परिवहन मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, अजून एका पगाराची व्यवस्था दिवाळी आधी करण्याचा प्रयत्न आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये, आम्ही त्यांच्या वेतनासाठी बॅंकेकडे कर्ज देखील मागितले आहे, असं परब यांनी सांगितलं. आज एका तासात कर्मचाऱ्यांना एका महिन्याचं वेतन मिळेल, त्यामुळं त्यांनी आत्महत्येसारखं पाऊल उचलू नये, असं आवाहन परब यांनी केलं.


एसटी कामगार संघटनेचं राज्यभर आक्रोश आंदोलन

एसटीच्या एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेनं आज राज्यभर आक्रोश आंदोलन केलं.  कोरोनाच्या काळात सोयी-सुविधांचा अभाव असताना एसटी कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. त्यामुळं एसटी महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोना बाधितही झालेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही काम करत असताना या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचं वेतन मिळालं नाही.  त्यामुळं आज एसटी कर्मचाऱ्यांनी घरासमोरच कुटुंबियांसमवेत आक्रोश आंदोलन केलं आहे.


एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर इंटक संघटना आक्रमक
एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर इंटक संघटना आक्रमक झाली आहे.  2 दिवसात कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही तर न भूतो न भविष्यती असं आंदोलन दिवाळी नंतर होणार असल्याचा इशारा  इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे.  हे सरकार संवेदनशील नाही, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. एसटी खाते मागील पंचवार्षिक पासून शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे तत्कालीन मंत्री दिवाकर रावते यांनी खाजगीकरण केल्यानं एस टी वर ही वेळ आल्याचा गंभीर आरोप छाजेड यांनी केला आहे.


एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला राज्य सरकार जबाबदार-  रावसाहेब दानवे
दिवाळीत बोनस तर सोडाच पण पगारही नाही ही गंभीर बाब आहे.  केंद्राने जसं पॅकेज दिलं राज्याने तसं पॅकेज दिलं असते तर अशी वेळ आली नसती. या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.


शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ
एसटी कामगारांचं तीन महिन्यांचं थकीत वेतन मिळावं यासाठी जालन्यात कामगारांनी कुटुंबियांसमवेत घरासमोरच आक्रोश आंदोलन केलंय. कोरोनाच्या काळात सोयी-सुविधांचा अभाव असताना एसटी कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. त्यामुळं एसटी महामंडळाचे बरेचसे कर्मचारी कोरोना बाधितही झालेत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही काम करत असताना या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचं वेतन मिळालं नाही.  त्यामुळं आज एसटी कर्मचाऱ्यांनी घरासमोरच कुटुंबियांसमवेत आक्रोश आंदोलन केलं आहे. दरम्यान या दिवाळीपूर्वी शासनानं आम्हाला थकीत वेतन, महागाई भत्ता आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल देण्यात यावी अशी मागणी या आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशारा कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला आहे.

जळगावच्या मनोज चौधरींची आत्महत्या, ठाकरे सरकारला धरलं जबाबदार
कोरोनाच्या काळा पासून एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकांना चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याचं पाहायला मिळत आहे. वेतन न मिळाल्यानं जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी आणि जळगाव एसटी महामंडळात वाहक पदावर काम करत असलेल्या मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठीत एस टी महामंडळ आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.