छटपूजा साजरी करण्यासाठी भाजप आग्रही; मुंबईत शिवसेना-भाजपचा 'सामना' रंगणार
राज्य सरकारने मंदिरे उशीरा उघडली आणि आता छटपूजेलाही परवानगी नाकारली आहे. | Atul Bhatkhalkar
मुबई:परवानगी मागितली होती. मात्र, तरीही सरकारने ही परवानगी नाकारली. आम्ही शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेचा निषेध करतो, असे भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सांगितले.
ते बुधवारी मुंबईत प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी छटपूजेच्या मुद्द्यावरून भाजप आगामी काळात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले. राज्य सरकारने मंदिरे उशीरा उघडली आणि आता छटपूजेलाही परवानगी नाकारली आहे. हे सरकार हिंदूविरोधी आहे, आम्ही त्याचा निषेध करतो, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले.
अतुल भातखळकर यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मुंबईत छटपूजेवरून भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता आहे. मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांचा टक्का पाहता छटपूजेवरून कायम राजकारण रंगते. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे भाजपकडून छटपूजेचा मुद्दा उचलण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
येत्या शुक्रवारी व शनिवारी म्हणजेच दिनांक 20 व 21 नोव्हेंबर रोजी मुंबईत समुद्र किंवा नदी किनारी छटपूजा आणि या उत्सवाशी संबंधित कार्यक्रम करण्यास बंदी घातली आहे. पालिकेने त्याबाबतची नियमावली मंगळवारी जाहीर केली होती.
त्यानुसार छटपूजा विषयक सार्वजनिक कार्यक्रमांचे समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी करण्यात येणाऱ्या आयोजनांवर बंधी घालण्यात आली आहे. समुद्रकिनारी छटपूजेस होणारी गर्दी लक्षात घेता ‘कोविड – 19’ मार्गदर्शक तत्त्वांचे विशेषत: सामाजिक अंतर राखणे शक्य होणार नाही. त्यामुळे सामूहिक छटपूजेची परवानगी देता येणार नाही, असे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले होते.

