दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या चर्चा, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचं स्पष्टीकरण
दिल्लीत तूर्तास लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही, असं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी स्पष्ट केलंय.
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. दिल्ली सरकारने काही प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. अशातच दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या चर्चा सुरु होत्या. परंतु दिल्लीत तूर्तास लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही, असं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी स्पष्ट केलंय. (Delhi Deputy Cm manish Sisodiya Delhi Lockdown)
दिल्लीतल्या रुग्णालयांमधले 90 टक्के आयसीयू बेड फुल झाले आहेत. केंद्राकडून पहिल्या टप्प्यात 250 बेड्स लवकरच मिळतील. केंद्राकडून एकूण 750 आयसीयू बेड्स मिळणार आहेत. दिल्लीत 26 हजार कोरोनाबाधित रुग्ण आयसोलेशनमध्ये आहेत. अशाही परिस्थितीत दिल्लीत लॉकडाऊन लावण्याचा राज्य सरकारचा कोणताही इरादा नाही, असं सिसोदिया यांनी स्पष्ट केलं.
कोरोनाला हरवण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. कोरोनाला हरवण्याचा एकमात्र उपाय आहे मेडिकल सेवेमध्ये अधिकाधिक सुधारणा, असंही सिसोदिया म्हणाले. दिल्लीत सध्या 26 हजार कोरोनाबाधित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत तसंच 16 बेड्स आहेत ज्यापैकी 50 टक्के बेड्स आहेत, अशी माहितीही सिसोदिया यांनी दिली.
दिल्लीतील दुकानदार आणि व्यायसायिकांना मी आश्वासित करु इच्छितो, की आपण घाबरुन जावू नका. दिल्लीत सध्या कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन लागणार नाही. कन्टेन्मेट झोनमध्ये किंवा अधिक संक्रमण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी टाळेबंदीचा राज्य शासनाचा विचार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा- अरविंद केजरीवाल
“सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड्सची संख्या पुरेसी आहे. परंतु आयसीयूमध्ये बेडची कमतरता आहे. त्यासाठी केंद्र सरकारने मदत केली आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र मिळून काम करत आहे परंतु सर्वात मोठी गरज आहे ती म्हणजे लोकांनी काळजी घेतली पाहिजे. बरेच लोक मास्कशिवाय फिरत आहेत. माझं त्यांना आवाहन आहे की कृपया मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा”, असं केजरीवाल म्हणाले.
दिल्लीत कोरोनाचं संक्रमन कसं वाढलं?
दिल्लीत कोरोना संक्रमनाचा वेग मंदावला होता. मात्र, गेल्या दोन आठवड्यात संक्रमनाचा वेग वाढला. दिल्लीत 28 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा 5 हजार 673 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर 2 नोव्हेंबर वगळता दररोज पाच हजार पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित आढळत आहेत.
दिल्लीत कोरोना संक्रमन वाढण्यामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. सणांनिमित्ताने लोक एकमेकांच्या जास्त संपर्कात आले. याशिवाय दिल्लीत प्रदूषणदेखील वाढलं आहे. त्याचबरोबर थंडीदेखील वाढली आहे. या कारणांमुळे दिल्लीत कोरोना रुग्ण वाढले आहेत.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागरिकांनी मास्क वापरावं, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं, असा सल्ला तज्ज्ञांनी दिल्लीच्या नागरिकांना दिला आहे.

