तासगाव :तालुक्यातील बस्तवडे येथे डोंगराला सुरुंग लावून सपाटीकरण करत असताना जिलेटीनच्या कांड्या ठेवलेल्या गाडीच्या कॉम्प्रेसर, गॅस सिलेंडर व डिझेल टाकीचा स्फोट.

0 झुंजार झेप न्युज

तासगाव :तालुक्यातील बस्तवडे येथे डोंगराला सुरुंग लावून सपाटीकरण करत असताना जिलेटीनच्या कांड्या ठेवलेल्या गाडीच्या कॉम्प्रेसर, गॅस सिलेंडर व डिझेल टाकीचा स्फोट.

*बस्तवडे येथील स्फोटाची चौकशी सुरू*

*विशेष पोलीस महानिरीक्षांकडून घटनास्थळाची पाहणी : सखोल चौकशीचे आदेश*

तासगाव :तालुक्यातील बस्तवडे येथे डोंगराला सुरुंग लावून सपाटीकरण करत असताना जिलेटीनच्या कांड्या ठेवलेल्या गाडीच्या कॉम्प्रेसर, गॅस सिलेंडर व डिझेल टाकीचा स्फोट होऊन दोघेजण ठार झाले. रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. याप्रकरणी सोमवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, एवढी गंभीर घटना घडून 24 तास उलटले तरी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.


बस्तवडे येथील गट नं. 377 मधील विजयसिंह राजे पटवर्धन यांचा डोंगर यूएसके ऍग्रोचे संभाजी चव्हाण व अन्य तिघांनी विकत घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या डोंगराचे सपाटीकरण करून जमीन तयार करण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी कृषि विद्यापीठ उभारणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

   या सपाटीकरणासाठी ब्रेकर, जेसीबी, डंपर, बोअर ब्लास्टिंगच्या मशीनचा वापर करण्यात येत आहे. सुमारे 40 हुन अधिक मजूर याठिकाणी दररोज काम करीत आहेत. संभाजी चव्हाण यांनी या कामाचा ठेका शिवशक्ती कन्स्ट्रक्शनचे श्री. जंगम यांना दिला आहे.

  गेल्या काही महिन्यांपासून शिवशक्ती कन्स्ट्रक्शनने या डोंगरालाच सुरुंग लावण्याचे काम सुरू केले आहे. शेकडो फूट उंचीचा डोंगर सुरुंग लावून उध्वस्त केला जात आहे. डोंगर फोडून याठिकाणी सपाटीकरण करून जमीन केली जात आहे. हा डोंगर फोडण्यासाठी जिलेटीनसारख्या स्फोटकांचा वापर केला जात होता. बोअर ब्लास्टिंग करून हा डोंगर जमीनदोस्त करण्यात येत होता.

 रविवारी दुपारी डोंगरात घेतलेल्या बोअरमध्ये जिलेटीनच्या कांड्या घालून स्फोट करण्यात येणार होता. त्यासाठी जिलेटीनच्या कांड्या आणण्यात आल्या होत्या. या कांड्या बोअर ब्लास्टिंगच्या गाडीवर होत्या. मात्र बोअर घेत असताना गाडीचा कॉम्प्रेसर गरम झाल्याने या गाडीचा, डिझेल टाकी व गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर शेजारी उभा असणाऱ्या दुसऱ्याही गाडीचा स्फोट झाला. या स्फोटात प्रतीक स्वामी व महेश दुडणावार या दोघांचा बळी गेला. तर ईश्वर बामणे हा जखमी झाला.


 या दुर्घटनेनंतर सोमवारी दुपारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बॉम्ब स्कॉड पथक व इतर तपास यंत्रणांना याप्रकरणी सखोल तपासाच्या सूचना दिल्या. तपासाधिकारी म्हणून तासगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांची नियुक्ती करण्यात आली.

 दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी स्फोटकांचे 13 नमुने ताब्यात घेतले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत पाठवून नेमका स्फोट कशामुळे झाला याचा तपास होणार आहे. शिवाय स्फोट झालेल्या क्षेत्राच्या भोवती पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी कामगारांचे जबाबही नोंदवण्यात आले.

 सोमवारी दुपारी विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया यांच्यासह पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, तासगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 


*स्फोटकांबाबत पोलीस आणि महसूलकडून एकमेकांकडे बोट*

दरम्यान, भल्या मोठ्या डोंगराला सुरुंग लावून स्फोट करण्यात येत असल्याचे चव्हाट्यावर आल्यानंतर आता यासाठीच्या परवानगीचा विषय ऐरणीवर आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांना विचारले असता ते म्हणाले, 'अशा प्रकारचे स्फोट करून जमीन फोडण्याची परवानगी पोलीस खात्याकडून देण्यात येत नाही. हा विषय महसुलच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे याच्या परवानगीबाबत तहसील कार्यालयातून माहिती घ्या'. तर, याबाबत तहसीलदार कल्पना ढवळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, 'अशा पद्धतीच्या स्फोटाची तासगाव तहसील कार्यालयाकडून कोणतीही परवानगी दिली नाही. हा विषय आमच्या कार्यालयाच्या अखत्यारीत येतच नाही'. त्यामुळे या स्फोटाच्या परवानगीबाबतीत पोलीस आणि महसूल विभाग एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे.


*स्फोट कशामुळे झाला हा प्रश्न अनुत्तरीतच  

दरम्यान, एवढा भीषण स्फोट होऊन 24 तास उलटून गेले तरी अद्याप हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांना करता आला नाही. त्यामुळे हा स्फोट गाडीचा कॉम्प्रेसर गरम होऊन झाला की जिलेटीनच्या कांडीचा झाला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.


गुन्हा नेमका कोणावर दाखल होणार?

 बस्तवडे येथील या भीषण स्फोटात दोन निरपराध युवकांचा बळी गेला. डोंगर फोडून सपाटीकरण करताना वापरण्यात येणाऱ्या भुसुरुंगाबाबत याठिकाणी कोणतीही काळजी घेण्यात येत नसल्याचे पुढे आले आहे. हा स्फोट करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे घटनास्थळी दिसून येते. त्यामुळे या गंभीर दुर्घटनेप्रकरणी नेमका कोनाकोणावर गुन्हा दाखल होणार, याकडे मृत्यू झालेल्या युवकांच्या नातेवाईकांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी जमिनीचे मालक यूएसके ऍग्रोचे संभाजी चव्हाण, शिवशक्ती कन्स्ट्रक्शनचे श्री. जंगम यांच्यासह जे - जे दोषी असतील त्या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, ही दुर्घटना घडून 24 तासांचा कालावधी उलटूनही अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.


घटनास्थळी जाण्यास पत्रकारांना मज्जाव

      सोमवारी दुपारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सखोल चौकशीचे आदेश दिले. मात्र, घटनास्थळी येण्यास पत्रकारांना मज्जाव करण्यात आला. हा मज्जाव नेमका का करण्यात आला. नेमकं काय लपवायचं तर चाललं नाही ना. पत्रकारांना रोखून कोणाला पाठीशी तर घालण्यात येत नाही ना. गुन्हा दाखल करताना काही म्होरक्यांना वगळण्यात तर येणार नाही ना, असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत:

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.