शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’चा देशभरात परिणाम, कुठे परिक्षा रद्द, रेल्वे अडवल्या, तर कुठे नवदाम्पत्य फसलं!
देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी आणि अनेक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम रस्त्यांवर, रेल्वे रुळांवर, मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली: शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम आता देशभरात विविध ठिकाणी पाहायला मिळत आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी आणि अनेक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम रस्त्यांवर, रेल्वे रुळांवर, मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. रोज लागणाऱ्या दूध, फळ आणि भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर या भारत बंदचा परिणाम दिसून येत आहे.
बिहारच्या वैशालीमध्ये वधू-वर अडकले!
बिहारमधील वैशालीच्या भगवानपूरमध्ये आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग 22 जाम केला आहे. त्यामुळे लग्न करुन परत निघालेलं नवदाम्पत्य रस्त्यावरच अडकून पडलं. हाजीपूरवरुन लग्न उरकून परतल्यानंतर मुजफ्फरपूरला निघालेलं हे नवदाम्पत्य रस्त्यांवरील ट्राफिकमध्ये अडकलं आहे.
महाराष्ट्र: पुण्यात भाजीपाला मार्केट सुरु
पुण्यातील आडत बंद असली तरी भाजीपाला मार्केट आज सुरु आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांचं समर्थन करत आहोत. पण भाजीपाला मार्केट बंद करणार नाही. कारण, अन्य राज्यांतून आलेला भाजीपाला खराब होईल. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
प्रयागराज: समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुंदेलखंड एक्सप्रेस रोखली
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुंदेलखंड एक्सप्रेस रोखली आहे. सपाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रुळावर बसून कृषी कायद्याला आपला विरोध दर्शवला आहे.
आंध्र प्रदेशात डावे रस्त्यांवर
आंध्र प्रदेशच्या विजयवाडा इथं डाव्या पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज शेतकऱ्यांनी भारत बंद पुकारला आहे. त्या भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी डावेही रस्त्यावर उतरले आहेत.
ओडिशा मध्येही रेल्वे अडवल्या
ओडिशातील भुवनेश्वर रेल्वे स्थानकांवरही रेल्वे अडवून धरल्या जात आहेत. डावे, कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी इथं रेल्वे रुळावर उतरत रेल्वे गाड्या अडवून धरल्याचं चित्र पाहायला मिळालं.
उस्मानिया विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
हैदराबादेतील उस्मानिया विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर उद्या होणारी परीक्षा पार पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर आज रद्द करण्यात आलेल्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना सांगितलं जाईल, असं विद्यापीठाकडून कळवण्यात आलं आहे.
महाराष्ट्र: बुलडाण्यात स्वाभिमानीने रेल्वे अडवली
महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मलकापूर स्थानकावर रेल्वे अडवून धरली. यावेळी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

