भर रस्त्यात लोखंडी कोयत्याने केक कापणं महागात, बर्थडे बॉयसह मित्रांवर गुन्हा
लोखंडी कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या दोघांवर भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी चिंचवड : लोखंडी कोयत्याने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या दोघांवर भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे बर्थडे बॉय सोहेल शेखसह त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी 5 डिसेंबरला सोहेल शेख याचा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त जंगी आयोजन करण्यात आलं होती. पिंपरी चिंचवडमधील दापोडी गावाच्या हद्दीतील किनारा हॉटेलजवळ पीएमपीएल बस स्टॉप समोरील जागेत सोहेलचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी सोहेल शेखाचा केक कापण्यासाठी लोखंडी पाते आणि लाकडी मूठ असलेल्या एका लोखंडी कोयताचा वापर करण्यात आला. हा लोखंडी कोयता हातात धरुन केक कापून वाढदिवस साजरा करुन हत्यार प्रदर्शन करण्यात आले. या घटनेमुळे दापोडी गावात आणि इतर परिसरात दहशत पसरली.
या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) (27) 35 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एका आरोपीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून शहर असो किंवा गाव प्रत्येक ठिकाणी चौकात मोठ्या थाटात वाढदिवस साजरा करण्याचे फॅड पसरले आहे. चौकात वाढदिवस साजरा करून केक कापण्याचे लोण आता शहरी परिसरातून ग्रामीण भागाकडे हळू हळू वळू लागले आहे.
गावामधील गल्ली गल्लीत दादा, भाई यांचे वाढदिवस धुमधडाक्यात साजरे होत आहेत. यावेळी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी तलावारीने केक कापणे असे प्रकार केले जातात. मात्र गेल्या काही महिन्यात पोलिसांच्या धडक कारवाईमुळे अशाप्रकारे वाढिदवस साजरा करण्यावर लगाम बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.


