बोगस क्रीडा प्रमाणपत्र देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश , नागपूर पोलिसांची परभणीत कारवाई

0 झुंजार झेप न्युज

 

बोगस क्रीडा प्रमाणपत्र देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश , नागपूर पोलिसांची परभणीत कारवाई



परभणी : बोगस क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात परभणीच्या माध्यमिक शिक्षण विभागातील अधीक्षक संतोष कठाळे याला अटक करण्यात आले आहे. त्याच्या घरून बोगस क्रीडा प्रमाणपत्रे, क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या विविध कार्यालयांचे बनावट शिक्के व 40 बनावट प्रस्ताव सर्व बनावट दस्तावेज पोलिसांनी जप्त केला आहे.


राज्यात बनावट क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्र देणारी टोळी कार्यरत असल्याचे समोर आल्यानंतर नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात राज्यभरातील विविध शहरांमधील अनेक बड्या व्यक्तीचा सहभाग असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरु आहे. नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्ण शिंदे हे या प्रकरणाचा तपास करत असून ते स्वतःच त्यांच्या पथकातील संतोष राठोड, राघो चिलगर, मिलिंद नसरे, देवेन्द्र काळे यांच्यासमवेत परभणीत दाखल झाले आणि त्यांनी परभणीच्या माध्यमिक शिक्षण विभागातील अधीक्षक संतोष कठाळे याला अटक केली.


त्यानंतर त्याच्या गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील घराची झडती घेतली ज्यात पोलिसांना कंठाळेच्या घरात अनेक बनावट प्रस्ताव, वेगवेगळ्या क्रीडा कार्यालयांचे बनावट शिक्के, नोंदी असलेले रजिस्टर्स, प्रमाणपत्रांच्या याद्या, कोरे धनादेश, सह्या केलेले व काही कोरे क्रीडा प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आढळून आली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, उपसंचालक क्रीडा व युवक लातूर, औरंगाबाद, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे अशा अत्यंत महत्त्वाच्या कार्यालयांचे बनावट शिक्के यावेळी पोलिसांना आढळून आले आहेत.


दरम्यान या प्रकरणातील आरोपीने किती बनावट क्रीडा प्रमाणपत्रे कुणाकुणाला दिली हा पोलिसांच्या दृष्टीने तपासाचा विषय आहे. यापूर्वी पोलिसांनी या गुन्ह्यात दहा आरोपींना अटक केली आहे. याच गुन्ह्यात गंगाखेड तालुक्यातील कल्याण मुरकुटे यालाही अटक करण्यात आली असून त्याला नऊ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकूणच या प्रकरणात आणखी बड्या व्यक्तीची नावे समोर येण्याची चिन्हे आहेत त्यामुळे सध्या तरी परभणीसह राज्यभरातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.