ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 7 जानेवारी 2020 ला तिसरा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्यात रोहित खेळणार की नाही. याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
मेलबर्न : टीम इंडियाने मेलबर्नमधील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सने शानदार विजय (Aus vs Ind 2nd Test) मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. टीम इंडियाच्या विजयाचं मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Coach Ravi Shastri) यांनी कर्णधार रहाणेच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. तसेच हिटमॅन रोहित शर्माबाबतही (Rohit Sharma) शास्त्री यांनी वक्तव्य केलं. दुखापतीमुळे रोहितला पहिल्या 2 सामन्यांना मुकावे लागले. मात्र रोहित तिसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.
शास्त्री काय म्हणाले ?
“प्लेइंग इलेव्हनमध्ये 5 गोलंदाज खेळवण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. रोहित 30 डिसेंबरला संघासोबत जोडला जाईल. रोहित गेल्या काही दिवसांपासून क्वारंटाईन होता. रोहित संघात परतल्यानंतर कसा व्यक्त होतो, हे म्हत्वपूर्ण राहणार आहे”, असं शास्त्री म्हणाले. दुसऱ्या सामन्यानंतर व्हिडीओ कॉनफरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळेस शास्त्री बोलत होेते. शास्त्रींच्या या विधानामुळे रोहित तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही, याबाबत क्रीडा वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आयपीएल संपल्यानंतर रोहित ऑस्ट्रेलियाला न जाता थेट भारतात आला होता. तर टीम इंडिया दुबईहून परस्पर ऑस्ट्रेलियाला गेली. रोहितने एनसीएत (National Cricket Academy)फिटनेस टेस्ट दिली. या टेस्टमध्ये पास झाल्यानंतर रोहित ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. तेव्हापासून रोहित 14 दिवस सिडनीमध्ये क्वारंटाईन होता.
टेस्टसाठी ‘टेस्ट’
रोहितला तिसऱ्या कसोटीत खेळणं वाटत तेवढ सोपं नाही. रोहितला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी आणखी एक फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. या टेस्टवर रोहितचं भवितव्य अवलंबून आहे.
रोहितची ऑस्ट्रेलियातील कामगिरी
रोहितने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 5 कसोटी सामने खेळला आहे. यामध्या त्याने 31 च्या सरासरीने 279 धावा केल्या आहेत. नाबाद 63 ही त्याची ऑस्ट्रेलियाविरोधातील सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.
रोहितमुळे कोणाला डच्चू मिळणार?
रोहितला तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली, तर संघातून कोणाला वगळणार याबाबत चर्चा रंगू लागली आहे. तिसऱ्या सामन्यात मयंक अग्रवालला डच्चू मिळू शकतो. मयंक पहिल्या कसोटीत अपयशी ठरला. यानंतरही त्याला दुसऱ्या कसोटीत संधी दिली. मात्र या सामन्यातही तो अपयशी ठरला. यामुळे तिसऱ्या सामन्यात रोहितसाठी मयंकला बकरा केला जाऊ शकतो.
रहाणेचं कौतुक
रहाणे फार चपळ कर्णधार आहे. त्याला परिस्थितीनुसार कसं नेतृत्व करायची, याबाबत समज आहे. रहाणेच्या शांत स्वभावाचा आहे. या स्वभावामुळे नवख्या खेळाडूंना फायदेशीर ठरली. उमेशला गोलंदाजीदरम्यान दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले. मात्र यानंतरही अजिंक्य गोंधळला नाही, अशा शब्दात शास्त्रींनी रहाणेचं कौतुक केलं.
विराट आणि अजिंक्यच्या नेतृत्वात फरक काय ?
विराट आणि अजिंक्यच्या नेतृत्वाच्या बाबतीत काय फरक आहे, असा प्रश्न शास्त्रींना करण्यात आला. यावर शास्री म्हणाले की ” दोघांनाही खेळाची चांगली जाण आहे. विराट फार आक्रमक आणि फार उत्साही आहे. तर अजिंक्य शांत आणि संयमी आहे.”

